Atal Bihari Vajpayee : अकोलेकर प्रचारकाच्या मुशीत तयार झाले अटलजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:19 PM2018-08-17T13:19:54+5:302018-08-17T13:22:41+5:30

अकोला : अकोल्याच्या मातीने अनेक व्यक्तिमत्त्वांना आकार दिला. स्व. नारायणराव तर्टे हेदेखील याच मातीतील. अकोल्याच्या संघ प्रचारकाने ग्वाल्हेरमध्ये संघाचे काम करून तरुण वयातील अटलबिहारी वाजपेयी यांना संघात आणले.

Atal Bihari Vajpayee: akola pracharak bring atalji in rss | Atal Bihari Vajpayee : अकोलेकर प्रचारकाच्या मुशीत तयार झाले अटलजी!

Atal Bihari Vajpayee : अकोलेकर प्रचारकाच्या मुशीत तयार झाले अटलजी!

Next
ठळक मुद्देसुरुवातीला अटलजी नारायण तर्टे यांना टाळायचे; परंतु नारायणरावांनी त्यांचा पिच्छाच पुरविला. अटलजी वडीलबंधू ब्रजबिहारी, लहान भाऊ प्रेमबिहारी यांच्याबरोबर संघाच्या शाखेवर यायला लागले आणि कधी संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक झाले.नारायणराव तर्टेंसारख्या व्यक्तिमत्त्वाने त्यांना संघ प्रवाहात आणले नसते. अटलजी पंतप्रधान बनले नसते, असे संघात अनेकजण बोलतात.


- नितीन गव्हाळे
अकोला : अकोल्याच्या मातीने अनेक व्यक्तिमत्त्वांना आकार दिला. स्व. नारायणराव तर्टे हेदेखील याच मातीतील. अकोल्याच्या संघ प्रचारकाने ग्वाल्हेरमध्ये संघाचे काम करून तरुण वयातील अटलबिहारी वाजपेयी यांना संघात आणले. त्यांच्यावर संघ संस्कार केले. त्यांच्यातील व्यक्तिमत्त्वाला झळाळी दिली. नारायणराव तर्टेंसारख्या समर्पित व्यक्तिमत्त्वाने अटलजींना घडविलेच नाही, तर या देशाला एक पंतप्रधान देण्याचे काम केले.
स्व. नारायणराव तर्टे हे अकोल्यातील. तसा राजयोगी नेता पुस्तकामध्येदेखील उल्लेख आहे. नारायण तर्टे हे संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक. संघाचा प्रचारक म्हणून आपणही काम करावे, असे त्यांना वाटायचे. त्यांच्या आग्रहाखातर सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी त्यांना १९३७-१९४३ दरम्यान ग्वाल्हेरला संघ प्रचारक म्हणून पाठविले. या ठिकाणी गेल्यावर त्यांनी संघाचे काम सुरू केले. ग्वाल्हेरमध्ये काम करताना ते नेहमी अटलबिहारी यांच्या घरी जात असत. सुरुवातीला अटलजी नारायण तर्टे यांना टाळायचे; परंतु नारायणरावांनी त्यांचा पिच्छाच पुरविला. हळूहळू अटलजी वडीलबंधू ब्रजबिहारी, लहान भाऊ प्रेमबिहारी यांच्याबरोबर संघाच्या शाखेवर यायला लागले आणि कधी संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक झाले, हे त्यांनाही कळले नाही. अटलजी, नारायणराव तर्टे यांना मामू म्हणत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अटलजींवर प्रभाव पडला होता. पुढे नारायणराव पिलीभीत आणि नंतर लखनऊला प्रचारक म्हणून गेले. तेव्हाही अटलजींचा नारायणरावांशी स्नेह होता. नारायणरावांसोबत राष्ट्रधर्म मासिकातही अटलजींनी काम केले. त्यानंतर अटलजींनी ‘पांचजन्य’चे संपादक म्हणून काम केले. पुढे जनसंघाचे नेते म्हणून अटलजी काम करून लागले. खासदार झाले. देशाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री बनले आणि पुढे भाजपची सत्ता आल्यावर अटलजी देशाचे पंतप्रधान बनले. नारायणराव तर्टेंसारख्या व्यक्तिमत्त्वाने त्यांना संघ प्रवाहात आणले नसते. अटलजी पंतप्रधान बनले नसते, असे संघात अनेकजण बोलतात.

तर बनले असते कम्युनिस्ट नेता!
नारायणराव तर्टे यांनी ग्वाल्हेरमध्ये संघ प्रचारक म्हणून कामास सुरुवात केली. त्यावेळी अटलबिहारी हे महाविद्यालयात ‘एसएफआय’ या कम्युनिस्ट विचारांच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यावेळी संघगुरू नारायणरावांनी अटलजींना संघात आणण्याचे प्रयत्न केले आणि ते यशस्वीदेखील झाले. अटलजी संघात आले नसते, तर कदाचित ते कम्युनिस्ट नेता म्हणून तरी उदयास आले असते. हे अटलजीसुद्धा अनेकदा बोलून दाखवायचे.


नागपुरात आले की संघगुरूंची घेत भेट
अटलजींचे संघ शिक्षक नारायणराव तर्टे हे नागपूरला असत. काही काम, कार्यक्रमानिमित्त अटलजींचे नागपुरात येणे व्हायचे; परंतु आपल्या संघ शिक्षकांना भेटल्याशिवाय कधी जात नसत. आपल्या प्रिय मामूची चौकशी करून ते पुढे जात. पत्र पाठवून त्यांची आस्थेने चौकशी करीत.

 

Web Title: Atal Bihari Vajpayee: akola pracharak bring atalji in rss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.