Akot Market Committee: Four Directors With Inaugural Appointments, Deputy Chairman! | अकोट बाजार समिती: सभापती, उपसभापतींसह चार संचालक अपात्र!
अकोट बाजार समिती: सभापती, उपसभापतींसह चार संचालक अपात्र!

ठळक मुद्देउपविधीचे उल्लंघन करणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व अन्य दोन संचालकांना जिल्हा निबंधकांनी अनियमिततेच्या कारणावरून संचालक पदावरून अपात्र केले. त्यामुळे सहकार व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 
अकोट बाजार समितीचे तत्कालीन संचालक व विद्यमान सभापती रमेश बोंद्रे, उपसभापती शंकरराव चौधरी, संचालक मोहन जायले, रामविलास अग्रवाल यांनी पदावर असताना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियम) नियम १९६३ मधील तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियम) नियम १९६७ मधील तरतुदींचे व उपविधींचे वारंवार उल्लंघन केले. त्यामुळे ४१ (१) (आय) व (क) अंतर्गत त्यांच्या पदाला अनर्हता प्राप्त झाली आहे. त्यामुळे ते संचालक म्हणून पदावर राहू शकत नाहीत. त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी तक्रार जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधकांनी या तक्रार अर्जावर बाजू मांडण्याकरिता संचालकांना नोटीस बजावली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीअंती उपरोक्त चार   संचालकांना पदावरून अपात्र करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अकोट बाजार समिती राजकीय आखाडा झाला असल्याचे दिसून येत आहे. 
बाजार समितीमध्ये एकमेकांविरुद्ध तक्रारी, चौकशी, कारवायांना घेऊन कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याने शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय मागे पडत आहेत. शेतकर्‍यांना बाजार भावापासून विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ प्रभावाने बाजार समिती बरखास्त करून जिल्हा उपनिबंधक यांचे प्रशासक नेमावेत, अशा प्रतिक्रिया शेतकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहेत. 

मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात अनियमितता झाली होती. या कारणावरून अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती, उपसभापती व दोन संचालकांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
- प्रकाश लाड, सहकार अधिकारी, अकोला. 

अद्यापपर्यंत अपात्रतेचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ. 
- रमेश बोंद्रे, सभापती, कृ.उ,बा.स.अकोट.


Web Title: Akot Market Committee: Four Directors With Inaugural Appointments, Deputy Chairman!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.