कोपरगावात शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 06:40 PM2017-10-14T18:40:34+5:302017-10-14T18:43:59+5:30

Farmers stopped Kanda auction at Kopargaon | कोपरगावात शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडले

कोपरगावात शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडले

googlenewsNext

कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापा-यांनी भाव पाडल्याचा आरोप करीत शनिवारी संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याने एकच गोंधळ उडाला.
शनिवारी सकाळी अकरा वाजता तालुक्यातील शेतक-यांनी बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला. मात्र १ हजार ७०० रुपयांचा भाव काढल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर ज्ञानदेव रोहोम, संजय लोखंडे, जनार्दन रोहोम, विकास भिंगारे, अशोक लोखंडे, हरिभाऊ शिंदे आदी संतप्त शेतक-यांनी २ हजार ५०० चा भाव देण्याची मागणी करीत कांद्याचे लिलाव बंद पाडले. या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. दरम्यान उपसभापती नानासाहेब गव्हाणे यांनी तातडीने शेतकरी व व्यापा-यांची बैठक घेऊन समजूत काढली. परंतु शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे एक वाजेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू होऊ शकले नाहीत. सभापती मधुकर टेके व सचिव परसराम सिनगर उपस्थित होते.

लिलावात चुकीचे वागणा-यांवर कारवाई केली जाईल. व्यापा-यांनी सुध्दा शेतक-यांना अधिक मोबदला देण्याची काळजी घ्यावी. शेतक-यांनी व्यापा-यांना विनाकारण त्रास देऊ नये. लिलावास गैरहजर ३-४ व्यापा-यांना नोटिसा काढण्यात येतील. चुकीचे वागणा-या शेतक-यांना समज देण्यात येईल.
-नानासाहेब गव्हाणे, उपसभापती


कांद्याला येवला-राहात्याप्रमाणे भाव देण्याची शेतक-यांची मागणी होती. त्यावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. काही शेतकरी जाणीवपूर्वक लिलाव बंद पाडतात, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे. आजचे भाव सरासरी १ हजार ६०० ते १ हजार ८०० रूपये निघाले होते. लिलावास १५ पैकी १० व्यापारी हजर होते.
-परसराम सिनगर, सचिव


ज्याचा माल नाही, त्याने व्यापा-याला शिवीगाळ केली. वास्तवत: ज्याचा माल आहे, त्यानेच आडत्याशी चर्चा करावी. इतरांना बोलण्याचा अधिकार नाही. बाजार समितीने दोषी व्यापा-यांसह शेतक-यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा, पुढील लिलाव होणार नाहीत.
-अजित लोहाडे, व्यापारी

Web Title: Farmers stopped Kanda auction at Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.