ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 08:02 PM2018-09-08T20:02:48+5:302018-09-08T20:03:25+5:30

sugarcane is bend but his Juice is sweet | ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा...

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा...

Next

- धर्मराज हल्लाळे

आपल्या सभोवताली असणारी माणसे, परिस्थिती समजून घेताना जे दिसते तेच आपण जाणतो. पण म्हणतात ना, ‘दिसते तसे नसते'. अगदी त्याच अर्थाने संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. उसाची वाढ होताना तो काही ठिकाणी वाकतो. पण त्याच्या रसाचा मूळ गुणधर्म काही बदलत नाही. त्यामुळे वरवरचं रूपडं आणि रसाचा गोडवा याचा अर्थाअर्थी संबंध नाही. त्यामुळेच संत चोखामेळा सांगतात, ‘काय भुललासी वरलिया रंगा'. हे संत वचन आपल्या जीवनात कधी ना कधी अनुभवास येते. फरक इतका असतो की, ही अनुभूती कित्येकदा वेळ निघून गेल्यावर येते. मग आपण स्वत:ला समजावतो, वर-वरच्या रूपाला, स्थितीला आपण भाळलो. कधी कोणी रंग बदलून फसविले. कधी आपणाला कोणाचा मूळ सद्गुणी रंग दिसला नाही.


मुलगा चुकला, वडिलांनी रागावले. आईने दोन कठोर शब्द सुनावले. त्याच क्षणी मुलगा समजतो ती स्थिती आई-वडिलांबाबत प्रत्यक्षात असते का? ते वज्रासारखे वाटणारे शब्द अभंगातल्या वाकड्या उसासारखे असले तरी त्यामागची भावना रसासारखी मधूर असते. त्या गोड अनुभवाची प्रचिती ज्यांना लवकर उमजते, त्यांचे आयुष्य समृद्ध बनते. ज्याला जितका उशीर तितके जीवनातील माधुर्याचे आस्वाद उशिराने. काहींना तर अगदी शेवटाला कळते. आणि मग तो म्हणतो, मी ऊस डोंगा पाहिला अर्थात कटू शब्द ऐकले. मात्र रसाची गोडी चाखलीच नाही. आई-वडिलांची सद्भावना समजू शकलो नाही, आता वेळ निघून गेली. आई-वडील, मित्र, मैत्रीण असे नाते कोणतेही असो ते नाते या अभंगातून कायम अभंग राहील, हा धडा प्रत्येकाला गिरविता येतो. आपण वावरतो त्या प्रदेशात गैरसमजाचे पीक अफाट येते. ज्याने नाती काळवंडून जातात, अशा वेळी वरलिया रंगा भुललो अर्थात त्यातले खरे जसे कळले नाही तसे काही वेळा त्यातले खोटेही कळले नाही. ही भावना अपराधी बनविते. 


तात्पर्य हेच की, आम्ही जे घडते, बिघडते त्याचा अंतिम परिणाम, प्रभावाचा विचार समजून उमजून घेतला पाहिजे. अंतिमत: जे काही घडले त्यावर रागवायचे की, खुश होऊन लगेच फुगायचे हे ठरवताना समोरच्याचा मूळ हेतू लक्षात घेतला पाहिजे.

Web Title: sugarcane is bend but his Juice is sweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.