कर्म आणि ज्ञान हीच भक्तीयोगाची लक्षणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 07:47 PM2019-01-25T19:47:22+5:302019-01-25T19:47:56+5:30

अध्यात्मिक तत्त्वज्ञानात कर्मापेक्षा ज्ञानाला व ज्ञानापेक्षा भक्तीला जास्त महत्त्व दिलेले आहे.

Karma and knowledge are the symptoms of devotion | कर्म आणि ज्ञान हीच भक्तीयोगाची लक्षणे 

कर्म आणि ज्ञान हीच भक्तीयोगाची लक्षणे 

Next

जें जें भेटू भूत । तें तें माणिजे भगवंत ।।
हा भक्तियोग निश्चित । जाण माझा ।।

 

संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींनी कर्म आणि ज्ञान ही दोन्ही भक्तियोगाची लक्षणे असल्याचे सांगितले आहे. आजच्या काळात देखील या दोन्ही भक्तीची नितांत  आवश्यकता आहे. व्यक्ती दिवसेंदिवस स्वतःच्या कर्मा पासून दूर जाताना दिसून येत आहे. त्यामुळे ज्ञान संचय व प्रसार या बाबी कमी होत असताना प्रगती कधी साध्य होईल यावर विचार करण्याची वेळ आली आहे. अध्यात्मिक तत्त्वज्ञानात कर्मापेक्षा ज्ञानाला व ज्ञानापेक्षा भक्तीला जास्त महत्त्व दिलेले आहे. निष्काम बुद्धीने आपण जे कर्म करतो तेव्हा, ते भक्तीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जी भक्ती केली जाते ते कर्माचे स्वरूप आहे. परमेश्वर चराचरात असून त्याची ही निर्मिती आहे. अशी समदृष्टी निर्माण होते.

आत्मज्ञान झाले की सुख आणि दुख खोटे आहे, हे जाणवते.  तसे झाले तरच मन संयमी व समाधानी राहते. संत ज्ञानेश्वरांनी भक्तांचे चार प्रकार सांगितले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थाथी आणि ज्ञानी अशा स्वरूपाचे भक्त विविध व्याधी, पिडा यामुळे ग्रासलेले असतात. असे भक्त व्याधी पासून मुक्ती मागतात. जिज्ञासू भक्त हा जगण्याची इच्छा प्रगट करतात. तर अर्थात या स्वरूपाचे भक्त बहुरूपी विळख्यात सापडलेले असतात. त्या उलट ज्ञानी भक्त हे संसाराच्या उपसागरातून स्वतःची मुक्ती  कशी होईल याकरिता प्रयत्नशील असतात. आजच्या काळात अर्थाती स्वरूपाचे भक्त सर्वत्र पहावयास मिळतात. प्रयत्न वादापेक्षा भूक वादात विलक्षण रुची निर्माण झाली आहे. आपण किती कालावधी चे पाहुणे आहोत, याचा विसर पडून जणू काही या भूतलावर आपणास अमरत्व प्राप्त झाले आहेत असे वागत आहेत. भोगवाद, वस्तू विलासी प्रवृत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे.

जैसे फळाचिया हावे। तैसे कर्म करी आघवे ।।
मग न किजेची येणे भावे । उपेक्षी जी ।।

 

चांगले कर्म करत राहणे हा सहज योग असताना देखील प्रथमतः फळाची अपेक्षा आणि त्यानंतर कर्म असे होताना आज तरी दिसत आहे. जो व्यक्ती फळाची अपेक्षा करुन कर्माचे आचरण करतो त्यांना बहुतांश वेळा निराशाच हाती येते. सर्व गोष्टी ह्या नाशिवंत असून मनुष्यदेह प्राप्तीनंतर सद्गुणांचा आणि ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार व्यक्तीस अजरामर करून जातो. मानवातील प्रगल्भता कर्तव्यनिष्ठा चराचरात मानलेली तर आहेच. परंतु समाजाच्या निकोप वाढीसाठी मदत करने, कर्मशील व कर्तव्यपरायण व्यक्ती या शतकानुशतके आपले अस्तित्व अधोरेखित करून जातात. महाराष्ट्रात अशा विचारांच्या संतांची जणूकाही खान आहे अंततः एवढेच म्हणावे वाटते 'हे विश्वचि माझे घर असे म्हणणारे ज्ञानदेव माऊली खऱ्या अर्थाने विश्वमित्र आहेत.

- भालचंद्र संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातुर.

Web Title: Karma and knowledge are the symptoms of devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.