वाहनांमध्ये कोंबून विद्यार्थ्यांची वाहतूक पुन्हा झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 11:00 PM2022-11-18T23:00:05+5:302022-11-18T23:00:35+5:30

शहरातील विवेक मंदिर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी व्हॅन नवीन बायपास रोडवर रस्त्याच्या खाली उतरून डबक्यात उलटली होती. सुदैवाने या अपघातात काही अप्रिय घडले नाही व सर्व विद्यार्थी सुखरूप होते. मात्र, या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनाला धसका बसला होता. तर पालक त्यांच्या पाल्यांना घेऊन चिंतीत झाले होते.

The transportation of students started again after being put in vehicles | वाहनांमध्ये कोंबून विद्यार्थ्यांची वाहतूक पुन्हा झाली सुरू

वाहनांमध्ये कोंबून विद्यार्थ्यांची वाहतूक पुन्हा झाली सुरू

Next

कपिल केकत 
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असलेली स्कूल व्हॅन रस्त्याशेजारी डबक्यात उलटल्याची घटना २० ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेनंतर वाहतूक नियंत्रण शाखेने त्या मार्गावर बंदोबस्त लावून पाचपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली होती. आतापर्यंत हा क्रम चालला. मात्र, मागील काही दिवसांपासून परत विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक सुरू झाल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई फक्त ‘चार दिन की चांदनी’च ठरल्याचे बोलले जात आहे. 
शहरातील विवेक मंदिर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी व्हॅन नवीन बायपास रोडवर रस्त्याच्या खाली उतरून डबक्यात उलटली होती. सुदैवाने या अपघातात काही अप्रिय घडले नाही व सर्व विद्यार्थी सुखरूप होते. मात्र, या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनाला धसका बसला होता. तर पालक त्यांच्या पाल्यांना घेऊन चिंतीत झाले होते. यावर पोलिस विभागाने लगेच कडक पाऊल उचलले व वाहतूक नियंत्रण शाखेकडून बायपास रोडवरील राजा भोज चौकात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. हे पोलिस पाचपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत होते. परिणामी विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची वाहतूक बंद होती. 
मात्र, दोन-अडीच महिन्यांतच परिस्थिती जैसे थे झाली आहे. कारण ­दिवाळीनंतर आता शाळा सुरू झाल्या असून, वाहनांत विद्यार्थी परत एकदा कोंबून नेले जात असल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेला २० ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेचा विसर पडला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यामुळेच विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांनी परत एकदा आपली मनमर्जी सुरू केल्याची दिसते. यात मात्र विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. 

कित्येकदा घडले असले अपघात 
- २० ऑगस्ट रोजी स्कूल व्हॅनचा घडलेला अपघात हा काही पहिलाच अपघात नव्हता. यापूर्वी आणखीही अपघात घडले आहेत. अशात एकतर वाहनचालकांनी खबरदारीने वाहन चालविणे गरजेचे आहे. शिवाय, त्यांच्याकडून नियम मोडला जात असल्यास पोलिस विभागाने नजर ठेवणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने अपघात घडत आहेत.

थोड्या अंतरावर उतरविले जात होते विद्यार्थ्यांना 
राजा भोज चौकात पोलिसांचा बंदोबस्त असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन चालक त्यांना चौकापासून थोड्या अंतरावर गाडीतून उतरवित होते. त्यानंतर त्यातील ५-५ विद्यार्थ्यांना बसवून शाळेत सोडत होते. तर काही विद्यार्थी पायी-पायीच शाळेत जात असल्याचेही दिसत होते. आतापर्यंत हाच प्रकार सुरू होता. मात्र, दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या असून, आता पाचपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून त्यांची ने-आण सुरू आहे. 

 

Web Title: The transportation of students started again after being put in vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.