बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी ठार, पुसद तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 18:38 IST2021-12-27T18:24:26+5:302021-12-27T18:38:18+5:30
शैचास गेलेल्या युवतीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी पुसद तालुक्यातील वन विभागाच्या खंडाळा बीटमधील वडगाव शिवारात घडली.

बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी ठार, पुसद तालुक्यातील घटना
यवतमाळ : पुसद तालुक्यातील वडगाव शिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शैचास गेलेल्या युवतीवर हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी पुसद तालुक्यातील वन विभागाच्या खंडाळा बीटमधील वडगाव शिवारात घडली. भल्या पहाटे बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस येताच परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
शितल नागोराव शिंदे (वय २३) असे हल्लात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान गावातील मंदिरालगत असणाऱ्या शिवारात शौचासाठी गेली होती. दरम्यान झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणीच्या थेट मानेवर हल्ला केला आहे.
दरम्यान शेतशिवारात काम करणाऱ्या लोकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे घाबरलेला बिबट्या घटनास्थळावरून पसार झाला. ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली. पोलिसांनी आणि वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.