यवतमाळ जिल्ह्यात धनोडा येथे पैनगंगेच्या पुलावरून युवक, युवतीने घेतली नदीत उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 21:46 IST2021-09-01T21:45:45+5:302021-09-01T21:46:31+5:30
Yawatmal News धनोडा येथील पैनगंगा नदीच्या पुलावरून युवक आणि युवतीने नदीत उडी घेतली. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांचा शोध सुरू केला.

यवतमाळ जिल्ह्यात धनोडा येथे पैनगंगेच्या पुलावरून युवक, युवतीने घेतली नदीत उडी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तालुक्यातील धनोडा येथील पैनगंगा नदीच्या पुलावरून युवक आणि युवतीने नदीत उडी घेतली. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांचा शोध सुरू केला. (Young men and women jumped into the river from the bridge of Pangange at Dhanoda in Yavatmal district)
हेमंत राजेंद्र चिंचोलकर (३१) असे नदीत उडी मारणाऱ्या युवकाचे नाव असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी सांगितले. युवतीचे नाव सोनाली असल्याचे कळते. हे दोघेही बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास रामटेक ते माहूर या एसटी बसमधून तालुक्यातील धनोडा येथे उतरले. या दोघांनी धनोडा येथे बिस्कीट आणि फराळाचे साहित्य विकत घेतले. दोन तासांपर्यंत ते दोघेही धनोडा येथील बसस्थानक परिसरात घुटमळत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
त्यानंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास लगतच्या पैनगंगा नदीवरील पुलावर त्यांच्या चप्पल व पुलाच्या खांबाला लटकलेल्या अवस्थेत पर्स व बॅग आढळली. त्यामुळे या दोघांनीही नदीत उडी घेतली असावी, अशी शंका पोलिसांनी वर्तविली. याबाबत माहिती मिळताच स्थानिकांनी महागाव पोलिसांना माहिती दिली. एपीआय बालाजी शेंगेपल्लू व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी दोघांचा शोध सुरू केला. मात्र वृत्तलिहिस्तोवर दोघेही आढळले नाही.
वरोरा ठाण्यात मिसिंगची तक्रार
पोलिसांनी पर्स व बॅगमधील साहित्याची तपासणी केली. त्यात तरुणाचे नाव हेमंत चिंचोलकर असल्याचे आढळले. विशेष म्हणजे दीड महिन्यापूर्वी हेमंत बेपत्ता असल्याची तक्रार वरोरा पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.