यवतमाळची कोरोना लॅब तपासणीत दुसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 14:06 IST2020-10-01T14:03:42+5:302020-10-01T14:06:08+5:30
Corona lab, Yawatmal News मराठवाडा व विदर्भातील ३५ लॅबमध्ये यवतमाळच्या लॅबने तपासणीत द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

यवतमाळची कोरोना लॅब तपासणीत दुसऱ्या क्रमांकावर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३ जून २०२० रोजी कोरोना तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली. या प्रयोगशाळेने निर्मितीपासून २८ सप्टेंबरपर्यंत ५० हजार नमुन्यांची यशस्वी तपासणी केली. ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) नागपूरच्या अंतर्गत ही लॅब कार्यान्वित आहे. मराठवाडा व विदर्भातील ३५ लॅबमध्ये यवतमाळच्या लॅबने तपासणीत द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
यवतमाळच्या लॅबने तपासलेले नमूने खरंच बरोबर आहेत काय, याची पडताळणी करण्यासाठी नागपूर ‘एम्स’कडे पाठविले होते. १५ नमूने पॉझिटिव्ह व १५ नमूने निगेटिव्ह होते. या सर्व नमुन्यांची पुन:पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये १०० टक्के अहवाल बरोबर आला. अहोरात्र सुरू असलेल्या यवतमाळ मेडिकलमधील कोरोना लॅबने २८ सप्टेंबरपर्यंत ५० हजार नमूने तपासले आहे. लॅबकडे असलेली साधन सुविधा व इतर बाबींचा विचार करून ‘एम्स’ने यवतमाळ कोरोना लॅबला दुसरा क्रमांक दिला. पहिला क्रमांक नागपूरच्या लॅबला देण्यात आला.
येथील कोरोना लॅबमध्ये आवश्यक तंत्रज्ज्ञांची पदे मंजूर झाली नाहीत. तुटपुंज्या पदांवर लॅबचे काम अहोरात्र सुरू आहे. आता तर लॅबमधील तीन तंत्रज्ज्ञ कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आधीच कमी तंत्रज्ज्ञांच्या भरवशावर सुरू असलेले काम आणखीच अडचणीत आले आहे. लॅबचे प्रमुख डॉ. विवेक गुजर यांच्या मार्गदर्शनात कामकाज सुरू आहे.