दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आला; जिल्ह्यात ६० टक्क्यांवर विद्यार्थी अनुत्तीर्ण

By अविनाश साबापुरे | Published: August 28, 2023 01:26 PM2023-08-28T13:26:32+5:302023-08-28T13:27:07+5:30

फेरपरीक्षेकडे बहुतांश विद्यार्थी अजूनही गांभीर्याने बघत नसल्याचे वास्तव पुढे आले

Yavatmal SSC HSC re-examination results are out as 60 percent students failed in the district | दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आला; जिल्ह्यात ६० टक्क्यांवर विद्यार्थी अनुत्तीर्ण

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आला; जिल्ह्यात ६० टक्क्यांवर विद्यार्थी अनुत्तीर्ण

googlenewsNext

अविनाश साबापुरे, यवतमाळ: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल केवळ ३५.७५ टक्के तर बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल केवळ ३७.०३ टक्के आला आहे. त्यामुळे फेरपरीक्षेकडे बहुतांश विद्यार्थी अजूनही गांभीर्याने बघत नसल्याचे वास्तव पुढे आले.

राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै महिन्यात या दोन्ही वर्गांच्या फेरपरीक्षा घेण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी-मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळावी म्हणून फेरपरीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील ७१९ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ६७४ विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्षात परीक्षा दिली. त्यापैकी केवळ २४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे बारावीच्या फेरपरीक्षेसाठी जिल्ह्यातील ५२९ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५१३ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आणि त्यातून केवळ १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बहुतांश विद्यार्थी तृतीय श्रेणीत

फेरपरीक्षेचा निकाल कमी लागलेला असतानाच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी तृतीय श्रेणीत आले आहेत. दहावीतील एकूण २४१ उत्तीर्णांपैकी तब्बल २३८ विद्यार्थ्यांना तृतीय श्रेणी मिळाली आहे. तर केवळ एकाच विद्यार्थ्याला प्रथम श्रेणी घेता आली. बारावीचीही परिस्थिती तशीच आहे. बारावीतील एकंदर १९० उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १२६ जणांना तृतीय श्रेणीच मिळविता आली. मात्र तीन विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह गुण घेत यश संपादन केले आहे.

Web Title: Yavatmal SSC HSC re-examination results are out as 60 percent students failed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.