Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 07:20 IST2025-06-16T07:19:29+5:302025-06-16T07:20:35+5:30
Kedarnath helicopter crash News: उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरातून भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे गौरीकुंडच्या जंगलात शून्य दृश्यमानतेमुळे कोसळले

Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरातून भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे गौरीकुंडच्या जंगलात शून्य दृश्यमानतेमुळे कोसळले असून, या अपघातात महाराष्ट्रातील तिघांसह सात जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर राज्यातील चारधामची हेलिकॉप्टर सेवा सोमवारपर्यंत बंद करण्यात आली. केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात वणी शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजकुमार सुरेश जयस्वाल (४१), त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल (३६) व मुलगी काशी जयस्वाल (२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत राजकुमार यांची दोन्ही मुले त्यांच्यासोबत गेली नव्हती. त्यामुळे ते या दुर्घटनेतून बचावले.
राजकुमार यांची पत्नी श्रद्धा यांचा १० जून रोजी वाढदिवस होता. या निमित्ताने देवदर्शनासाठी ९ जूनला राजकुमार, श्रद्धा व त्यांची मुलगी काशी हे तिघे तसेच राजकुमार यांचे साडभाऊ व त्याची पत्नी असे पाचजण केदारनाथ येथे गेले होते. राजकुमार व त्यांचे कुटुंबीय एका हेलिकॉप्टरमध्ये तर साडभाऊ व त्याची पत्नी दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. ज्या हेलिकॉप्टरमध्ये नातलग होते, ते हेलिकॉप्टर सुखरूप पोहचले. मात्र, दीड तास उलटूनही राजकुमार यांचे हेलिकॉप्टर ठरलेल्या ठिकाणी पोहचले नाही. त्यानंतर काही वेळातच अपघाताची बातमी पुढे आली, अशी माहिती मृत श्रद्धाचे काका राजू बोरेले यांनी माध्यमांना दिली.
कसा झाला अपघात?
रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे व शून्य दृश्यमानतेमुळे खासगी कंपनी आर्यन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंड व केदारघाटीच्या त्रिजुगीनारायणजवळ कोसळले. त्यानंतर त्याला आग लागली. मृतांमध्ये बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे सदस्य विक्रम सिंह रावत यांचाही समावेश आहे.
पहाटे ५:१० : हेलिकॉप्टरचे गुप्तकाशी येथून उड्डाण.
पहाटे ५:१८ : श्री केदारनाथजी हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरले.
पहाटे ५:१९ : हेलिकॉप्टरचे गुप्तकाशीकडे उड्डाण.
पहाटे ५:३० ते ५:४५ : हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळले.
काही वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीचा मृत्यू
राजकुमार यांची पहिली पत्नी एकता यांचा काही वर्षांपूर्वी बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यांना आरव आणि विवान ही दोन मुले आहेत. त्यानंतर राजकुमार यांनी पांढरकवडा येथील बोरले कुटुंबातील श्रद्धाशी दुसरे लग्न केले. त्यांना एक मुलगी होती.