यवतमाळ: मुगाच्या शेंगा तोडल्या, मोठ्या भावाला शेतातच संपवले; चार वर्षाची मुलगी म्हणाली, "काकाने..."
By सुरेंद्र राऊत | Updated: August 26, 2025 17:37 IST2025-08-26T17:34:50+5:302025-08-26T17:37:48+5:30
माळकिन्ही येथील घटना : चार वर्षाच्या मुलीसमाेरच घडला थरार

Younger brother killed his elder brother for taking bean pods
गुंज (यवतमाळ) : शेतातील मुगांच्या शेंगा ताेडण्याच्या वादातून लहान भावाने माेठ्या भावाला काठीने बेदम मारहाण करून ठार केले. ही घटना महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथील शेतात मंगळवार, २६ ऑगस्ट राेजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
निलेश अशोक रिंगे (३५) असे मृताचे नाव आहे. नीलेशवर प्रदीप अशोक रिंगे (३०) याने काठीने प्रहार करून त्याला ठार केले. नीलेश याने यंदा कापसाच्या पिकात आंतरपीक म्हणून मुगांचे पीक घेतले आहे. मंगळवारी सकाळी प्रदीप मुगाच्या शेंगा तोडत असताना त्या ठिकाणी माेठा भाऊ निलेश त्यांच्या चार वर्षाच्या मुलीला घेवून आला. नीलेशने शेंगा तोडणाऱ्या प्रदीपला मनाई केली. यामुळे संतापलेल्या प्रदीपने काठीने नीलेशच्या ताेंडावर, डाेक्यावर हल्ला केला. यात निलेश गंभीर जखमी हाेऊन जागीच ठार झाला. यावेळी नीलेशची मुलगी रेणू तेथेच उपस्थित हाेते. वडिलांना रक्ताच्या थाराेळ्यात पाहून रेणूने थेट घराकडे धाव घेतली. घटनेनंतर आराेपी प्रदीप हा शेतातील झाडाखाली बसून हाेता. चार वर्षाच्या रेणूने वडिलांसाेबत झालेल्या घटनेचा थरार आईला सांगितला. त्यानंतर याची माहिती गावकऱ्यांनी महागाव पाेलिसांना दिली.
ठाणेदार धनराज नीळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाेलिस बघताच आराेपी प्रदीपने तेथून पळ काढला. महागाव पाेलिस व एलसीबी पथकाने पाठलाग करून आराेपी प्रदीपला ताब्यात घेतले. ही कारवाई सहायक पाेलिस निरीक्षक धीरज बांडे, संतोष बेरगे, मुन्ना आडे, तेजाब रणखांब, रमेश राठोड, कुणाल मुंडकर, सुभाष यादव, सुनील पंडागळे यांनी केली. उमरखेडचे एसडीपीओ हनुमंतराव गायकवाड यांनी घटणास्थळी भेट दिली.
चिमुकली रेणू घटनेची प्रत्यक्षदर्शी
काकानेच वडिलांचा काठीने मारून खून केला, या घटनेची चिमुकली रेणू प्रत्यक्ष दर्शी आहे. तिने हे आईला सांगितल्यानंतर खुनाची घटना गावकऱ्यांना माहिती झाली. पाेलिसांनी आराेपी प्रदीप रिंगे याला दाेराने बांधुन पाेलिस ठाण्यात नेले. मयत नीलेश याच्या मागे गराेदर पत्नी, वडील आणि चार वर्षांची मुलगी रेणू असा परिवार आहे. घटनेने गावात हळहळ व्यक्त हाेत आहे.