महिलेनेच वाचविले सौभाग्य
By Admin | Updated: December 27, 2014 02:36 IST2014-12-27T02:36:59+5:302014-12-27T02:36:59+5:30
दुचाकीवरून जाताना भामट्याने सौभाग्यावर घाला घातला. स्वत:ला सावरत तिने भामट्याचा मोठ्या हिमतीने पाठलाग सुरू केला.

महिलेनेच वाचविले सौभाग्य
ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ
दुचाकीवरून जाताना भामट्याने सौभाग्यावर घाला घातला. स्वत:ला सावरत तिने भामट्याचा मोठ्या हिमतीने पाठलाग सुरू केला. भामटा पुढे अन् ती मागे. चोरटा गोंधळून दुचाकीसह खड्ड्यात कोसळला. क्षणाचाही विलंब न लावता तिने मर्दानी रुप धारण केले. भामट्याशी दोन हात करीत आपले सौभाग्य वाचविले. पोलिसांंनाही लाजवेल असे अशक्यप्राय कर्तृत्व नागरिकांच्या मदतीने केले.
यवतमाळच्या उमरसरा भागातील रहिवासी दीपाली विलास झोपाटे (४०) ही आपल्या दुचाकीने शुक्रवारी दुपारी ३ वाजता घराकडे जात होती. शिरे ले-आऊटमधून जाताना एका भामट्याने तिच्या गळ्यातील सौभाग्यावर घाला घातला. काही कळायच्या आत तिचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून दुचाकीनेच पळ काढला.
मंगळसूत्र हिसकावल्याचे लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. एका क्षणात स्वत:ला सावरत मोठ्या हिंमतीने आपल्या दुचाकीने चोरट्याचा पाठलाग सुरू केला. चोरटा पुढे आणि दीपाली मागे. सिनेस्टाईल पाठलाग सुरू असताना परिसरातील नागरिकांनीही चोरट्यामागे धाव घेतली. या प्रकाराने गोंधळून गेलेला चोरटा दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळला. दीपालीने नागरिकांच्या सहकार्याने त्याला चांगलाच चोप देत आपले सौभाग्य लेणं परत मिळविले. पोलिसांनाही लाजवेल असे धाडस तिने दाखविले. नागरिकांनी चोरट्याला चोप देतच वडगाव रोड पोलिसांच्या हवाली केले.