‘सदोष गर्भ’पातासाठी महिलेची फरफट
By Admin | Updated: March 28, 2015 01:33 IST2015-03-28T01:33:42+5:302015-03-28T01:33:42+5:30
कन्या भ्रुणहत्या थांबविण्यासाठी करण्यात आलेले कायदेच आता महिलांच्या जीवावर उठत

‘सदोष गर्भ’पातासाठी महिलेची फरफट
सुरेंद्र राऊत ल्ल यवतमाळ
कन्या भ्रुणहत्या थांबविण्यासाठी करण्यात आलेले कायदेच आता महिलांच्या जीवावर उठत असल्याचे दिसत आहे. सदोष गर्भ असलेली एक सहा महिन्याची गर्भवती गर्भपातासाठी गत आठ दिवसांपासून रुग्णालयाचे उंबरठे झिजवीत आहे. मात्र कायद्याचा बागुलबुवा करीत या महिलेची हेळसांड केली जात आहे. तिचा तातडीने गर्भपात करण्याची गरज असल्याचे सांगणारे डॉक्टरच औषधी नसल्याचे कारण पुढे करीत प्रत्यक्षात गर्भपातासाठी नकार देत आहेत.
समाजातील लिंग गुणोत्तराचे प्रमाणे वाढविण्यासाठी, कन्या भ्रुणहत्या होऊ नये म्हणून अनेक कायदे करण्यात आले. गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक औषधी प्रतिबंधीत केली आहे. प्रत्यक्षात मात्र या औषधांचा काळाबाजार करून अनधिकृत गर्भपात केंद्रांचा सुळसुळाट आहे. ज्या महिलेला खऱ्या अर्थाने गर्भपाताची गरज आहे, त्यांच्यासाठीच नियमांचा कठोर जाच लावला जातो. घाटंजी तालुक्यातील आदिवासीबहुल गावातील महिलेची अशीच फरपट होत आहे. नियतीने सदोष गर्भ देऊन या महिलेची थट्टाच केली. आता येथील यंत्रणा तिच्या या दु:खात आणखी भर घालत आहे.
यवतमाळातील नामांकीत खसगी स्त्रीरोग तज्ज्ञाकडे या महिलेने उपचार घेण्यास सुरूवात केली. तिचे पहिले बाळ जन्मानंतर फार दिवस जगले नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा गर्भात असलेल्या बाळाची काळजी घेऊ लागली. डॉक्टरांच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक चाचण्या तिने करून घेतल्या. गर्भाच्या वाढीसंदर्भात नियमित सोनग्राफीही केली. कलर ड्रॉप्लर सोनोग्राफी करूनही सुरूवातीच्या तीन महिन्यात गर्भाबाबत पॉझिटीव्ह रिपोर्ट देण्यात आले. त्यानंतर मात्र पाचव्या महिन्यात गर्भाला हृदय, डोळे, किडणी यासारखे अवयव नसल्याची धक्कादायक माहिती सांगण्यात आली. त्यावेळी खासगी डॉक्टरांनी सरळ हात वर करून गर्भपातासाठी सावंगी मेघे येथे जाण्याचा सल्ला दिला. तेथील डॉक्टरांनी या महिलेला परत यवतमाळात पाठविले.
जिल्ह्यात आजही अनेक ठिकाणी अवैध गर्भपात केंद्र राजरोसपणे सुरू आहेत. अनेक डॉक्टर केवळ कायद्याच्या जाचामुळे गर्भपातासाठी पुढे येत नाही. याचा फायदा घेऊन अनेकांनी अवैध धंदे सुरू केले आहे. यातून आर्थिक मलिदा मिळत असल्याने गर्भपात विरोधी पथकांची कारवाईसुद्धा मंदावली आहे. गर्भपाताचे औषध विक्रीसाठी रेकार्ड मेन्टन करावे लागते. या कटकटीमुळेच अनेकजण ही औषधे विक्रीस ठेवत नाही. यातूनच काळा बाजार केला जात आहे.
गर्भपाताच्या औषधांचा काळाबाजार
अनेक दाम्पत्यांना चुकून झालेली गर्भधारणा नको असते, मात्र या नाजूक प्रसंगाची जाहीर वाच्यता त्यांच्याकडून केली जात नाही. हिच अडचण ओळखून कायद्याचा बागूलबुवा करणारे डॉक्टर आणि औषध विक्रेते आर्थिक लूट करतात. गर्भपाताची कीट ५०० रुपयाची आहे. मात्र त्याची तीन ते चार हजार रुपये दरात विक्री केली जाते. दुर्दैवाची बाब म्हणजे या काळ््याबाजाराचा फटका पोलीस दलात कार्यरत असलेल्या उच्च पदस्थ अधिकारी महिलेला काही दिवसांपूर्वी बसला आहे. प्रतिबंधाच्या नावाखाली अक्षरश: दाम्पत्यांची पिळवणूक केली जात आहे.