राळेगावात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 17:19 IST2021-12-20T17:11:52+5:302021-12-20T17:19:20+5:30
सोमवारी राळेगावातील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १८ झाली आहे. यातील एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील रहिवासी आहे.

राळेगावात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १८
यवतमाळ : जिल्ह्यात सोमवारी आणखी एक कोरोना रुग्ण आढळून आला. सोमवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेली महिला राळेगाव येथील रहिवासी असल्याचे प्रशासनाने सांगितले. विशेष म्हणजे रविवारीही राळेगावातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सलग दुसऱ्या दिवशी एकाच गावात कोरोना रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान, सोमवारी दिवसभरात दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १८ झाली आहे. यातील एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील रहिवासी आहे. आरोग्य विभागाला सोमवारी ४३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४३१ अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे.
आतापर्यंत एकंदर ७२ हजार ९७२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ७१ हजार १६६ जण कोरोनामुक्त झाले. तर १७८८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत सात लाख ७५ हजार ३३२ जणांच्या प्रशासनाने कोरोना चाचण्या केल्या. त्यातील सात लाख दोन हजार ३४८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९.४१ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ०.२३ आहे. तर मृत्यू दर २.४५ इतका कायम आहे.