पत्नीचं पहिलंच बाळंतपण...पण मुलगी मृत जन्मल्याने पित्याने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 20:48 IST2018-03-12T20:41:50+5:302018-03-12T20:48:28+5:30
अरविंदचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. पत्नी गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबात आनंदाला पारावार उरला नव्हता. अरविंदही पत्नीची काळजी घेत होता.

पत्नीचं पहिलंच बाळंतपण...पण मुलगी मृत जन्मल्याने पित्याने संपवलं जीवन
- सुरेंद्र राऊत
यवतमाळ : घरी पाळणा हालणार म्हणून आनंदीत असलेल्या कुटुंबात मृत मुलगी जन्माला आल्याचा धक्का सहन न होऊन पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शहरालगतच्या भोसा येथे सोमवारी सकाळी घडली.
अरविंद देवराव लांडगे (२३) असे मृत पित्याचे नाव आहे. अरविंदचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. पत्नी गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबात आनंदाला पारावार उरला नव्हता. अरविंदही पत्नीची काळजी घेत होता. रविवारी पत्नीला बाळंतपणासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला प्रसवकळा होऊन मुलगी झाली. परंतु हा आनंद क्षणभरही टिकला नाही. जन्माला आलेली मुलगी मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा धक्का अरविंदला सहन झाला नाही. तो थेट भोसा येथील घरी आला. त्याने स्वत:च्या शर्टाने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी अरविंदचा भाऊ प्रवीण याच्या लक्षात आला. त्याने अरविंदला रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. अरविंद हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होता. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.