पाकिस्तानातील मौलवीसोबतच्या चॅटचा वापर करून बदनामी; पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव
By दत्ता यादव | Updated: May 17, 2025 22:16 IST2025-05-17T22:15:05+5:302025-05-17T22:16:29+5:30
Yavatmal: दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील मौलानासोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट काढून पतीने पत्नीची बदनामी केली.

पाकिस्तानातील मौलवीसोबतच्या चॅटचा वापर करून बदनामी; पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव
दत्ता यादव, सातारा: दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील मौलानासोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट काढून त्याचा वापर करून पतीने सोशल मीडियावर बदनामी केल्याची तक्रार अभियंता असलेल्या पत्नीने सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित महिलेच्या पतीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील पीडित अभियंता असलेली विवाहिता ३८ वर्षांची आहे. पुणे येथे आयटी कंपनीत ती नोकरी करत होती. त्यानंतर ती साताऱ्यात आली. वर्क फ्रॉम होम सुरू असताना तिचा पती तिच्यावर संशय घ्यायचा. तिला दुसरीही मुलगी झाली. ही मुलगी माझी नाही असे म्हणून पती संशय घेऊन तिला मारहाण करू लागला. कोणताही कामधंदा न करता घरामध्ये पती बसून राहायचा. घरातून बाहेर जाऊ द्यायचा नाही. कोणाशी फोनवर किंवा समक्ष बोलून द्यायचा नाही.
कंपनीतून बॅंकेत जमा झालेला पगार दुसऱ्या बँकेच्या खात्यात जमा करून पती पैसे वापरायचा. स्वत:चा पगार पत्नीला तो वापरून द्यायचा नाही. सुमारे दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील एका मौलवीशी केलेल्या चॅटिंगचे स्क्रिनशॉट पतीने काढून ठेवले होते. त्याचा वापर करून त्या मौलानासोबत प्रेमप्रकरण आहे, असे सोशल मीडियावर पसरवून पत्नीची बदनामी करू लागला. त्यामुळे पत्नीने तलाक पाहिजे असल्याचे सांगितले. यावरून पतीने मारहाण केली. एवढेच नव्हे तर खोटे व चुकीचे व्हिडीओ प्रसारित करून पतीकडून बदनामी सुरू आहे. याचा जाब विचारल्यास सोशल मीडियावर आणखी बदनामी करून जिवे मारण्याची पती धमकी देत आहे. दिनां १५ मे २०२५ रोजी पतीला तलाक मागितल्याच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिस तपासताहेत दोन्ही बाजू
पती-पत्नीमधील वाद पाकिस्तानशी संबंधित असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. संबंधित अभियंता असलेल्या महिलेने पाकिस्तानमधील मौलवीशी नेमके काय चॅटिंग केले. पतीने पत्नीवर खोटे काय आरोप केले आहेत. याची माहिती आता सातारा शहर पोलिस घेत आहेत.