कोरोनाला हरविणारे बाळ जेव्हा पोलिसाच्या कवेत शिरते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:00:28+5:30

कोरोना आजारावर मात करणाऱ्या ३८ रुग्णांना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात एक आई आणि तिच्या एक वर्षाच्या बाळाचाही समावेश होता. रुग्णालयातून निघाल्यावर हे मायलेक इंदिरानगरातील आपल्या घरी पोहोचण्यापूर्वीच तेथे यवतमाळच्या एसडीपीओ माधुरी बाविस्कर आपल्या संपूर्ण ताफ्यासह हजर होत्या. इंदिरानगरातील २० पेक्षा जास्त कोरोनामुक्त नागरिक रुग्णवाहिकेतून आपआपल्या घराजवळ पोहोचले.

When the baby who lost Corona enters the police ... | कोरोनाला हरविणारे बाळ जेव्हा पोलिसाच्या कवेत शिरते...

कोरोनाला हरविणारे बाळ जेव्हा पोलिसाच्या कवेत शिरते...

Next
ठळक मुद्देएसडीपीओ माधुरी बाविस्कर यांची ‘हळवी’ कर्तबगारी : कोरोनामुक्त महिलांचे पोलिसांकडून जंगी स्वागत

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अवघ्या एक वर्षाच्या बाळाला कोरोना झाला... कुणाचेही काळीज त्या बाळाकडे पाहून विदीर्ण होणारच... पोलीसही शेवटी हळवे असतातच ना?... त्यामुळे हे बाळ पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्यातली मायाळू महिला जागली अन् त्यांनी चक्क ते बाळ उचलून कवेत घेतले. त्याचा लाड केला, चॉकलेट दिले, बोबड्या भाषेत नाव विचारले... हा प्रकार पाहून बंदोबस्तातील तैनात पोलीस कर्मचारीही गलबलून गेले.
कडक वर्दीत वावरणाऱ्या पोलिसांमधील मायेचा ओलावा उघड करणारा हा प्रकार शनिवारी सायंकाळी येथील इंदिरानगर परिसरात घडला.
कोरोना आजारावर मात करणाऱ्या ३८ रुग्णांना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात एक आई आणि तिच्या एक वर्षाच्या बाळाचाही समावेश होता. रुग्णालयातून निघाल्यावर हे मायलेक इंदिरानगरातील आपल्या घरी पोहोचण्यापूर्वीच तेथे यवतमाळच्या एसडीपीओ माधुरी बाविस्कर आपल्या संपूर्ण ताफ्यासह हजर होत्या. इंदिरानगरातील २० पेक्षा जास्त कोरोनामुक्त नागरिक रुग्णवाहिकेतून आपआपल्या घराजवळ पोहोचले. त्यावेळी रुग्णवाहिकेतून उतरणाऱ्या प्रत्येकाचे पोलिसांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले. त्यांचे नेतृत्व करणाºया एसडीपीओ माधुरी बाविस्कर तर थेट अ‍ॅम्बुलन्सजवळ पोहोचून त्यातील महिलांना अ‍ॅम्बुलन्समधून उतरविण्यासाठी हात देत होत्या. तेव्हा कोरोनाग्रस्त मायलेक रुग्णवाहिकेतून उतरत असताना बाविस्कर यांनी ते एक वर्षाचे बाळ झटकन उचलून घेतले. कडेवर घेतलेल्या त्या बाळाला लगेच आपल्या पर्समधील चॉकलेट भरविले. त्याच्या डोक्यावरून हात फिरविला. ‘बाळा तुझे नाव काय रे’ असे विचारत बोबड्या भाषेत लहानग्यासोबत लहान होऊन संवाद साधला. बाळाच्या आणि त्याच्या आईच्या मनातील भीती त्यामुळे आपसूकच पळून गेली...
कोरोनाचा रेड झोन बनलेल्या यवतमाळातील बंदोबस्त सांभाळताना एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांनी अत्यंत चाणाक्ष नियोजन केले. ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, सुरुवातीला यवतमाळात चार कन्टेन्मेंट झोन होते. आता ते कमी झाले. इंदिरानगरातील वस्ती अत्यंत दाटीवाटीची असल्याने तेथे संचारबंदीचे पालन कठीण होते. मात्र आम्ही जवळपास प्रत्येक घराला बॅरिकेटींग करून अनावश्यक संचार टाळला. साध्या गणवेशात आपले पोलीस तेथे काम करीत होते. या परिसरातील साडेतीन हजार पैकी ७०० लोकांची काटेकोर तपासणी झाली आहे. येथे दाट वस्तीमुळे ‘कम्युनिटी स्प्रिडींग’चा धोका होता. मात्र तो टाळण्यात काही अंशी यश आले आहे. स्वत: जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार येथे वारंवार येत होते. बैठका घेत होते. आरोग्य यंत्रणेसोबतच आम्ही पोलिसांनीही बारिक-सारिक गोष्टीचे नियोजन केले. प्रसंगी ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात आले. इंदिरानगरात कोणीही यायला तयार नसताना आपल्या पोलिसांनी स्वत: येथे विविध जीवनावश्यक वस्तू घरोघरी पोहोचविल्या. मेडिकल इर्मजन्सी असलेल्या नागरिकांना मदत पोहोचविली. त्यामुळे इंदिरानगरातील धोका पूर्णत: टळलेला नसला तरी आता बºयाच अंशी कमी झाला आहे.

महिलेचे काळीज महिलेसाठी पाझरले
यवतमाळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांचे लग्न जुळले आहे. मात्र कोरोना संकटातील वाढलेली जबाबदारी ओळखून त्यांनी हे लग्नकार्य पुढे लोटले आहे. सध्या त्या यवतमाळातील बंदोबस्तात पूर्णत: व्यस्त आहे. कौटुंबिक जबाबदाºया सांभाळून यवतमाळची कायदा व सुव्यवस्था राखताना त्या कसे नियोजन करत असतील ? पण बाविस्कर म्हणतात, घरी माझी आई सरलाबाई असल्यामुळे मला फारशी काळजी नाही, तीच माझी काळजी घेते त्यामुळे मी बाहेर राहून माझ्या जबाबदाऱ्यांवर फोकस ठेवू शकते. आईच्या तालमीत तयार झालेल्या एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांना कोरोनाग्रस्त मायलेक पाहून मायेचा पाझर फुटला.

पोलिसांचे काम ‘आई’सारखे !
यवतमाळच्या एसडीपीओ माधुरी बाविस्कर म्हणाल्या, आमचे पोलीस लोकांसाठी उन्हातान्हात काम करीत आहे. त्यांचे श्रम पाहून हे कोरोनाचे संकट लवकर संपावे असे वाटते. घराबाहेर पडणाºया नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई होत असली तरी, पोलिसांचे हे काम आईसारखे आहे. मुलगा चुकत असेल तर आईला कठोर व्हावेच लागते. आमचे पोलीस प्रतिबंधित क्षेत्रातसुद्धा पीपीई किट न घालता काम करीत आहे. त्यांना या संकटातून लवकर दिलासा मिळावा.

Web Title: When the baby who lost Corona enters the police ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.