जाहिरात लावायला चढला अन् करंट लागून पडला

By अविनाश साबापुरे | Updated: June 17, 2023 18:22 IST2023-06-17T18:21:26+5:302023-06-17T18:22:01+5:30

दोघांना विजेचा झटका : दुसरा युवक गंभीररीत्या भाजला 

Went up to advertise and got electrocuted | जाहिरात लावायला चढला अन् करंट लागून पडला

जाहिरात लावायला चढला अन् करंट लागून पडला

दिग्रस (यवतमाळ) : एका व्यापारी संकुलावर जाहिरातीचे फलक लावण्यासाठी दोन युवक चढले. मात्र त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. त्यात एक जण तिसऱ्या माळ्यावरून खाली पडला. तर दुसऱ्याच्या शरीरभर भाजल्याच्या जखमा झाल्या. ही घटना शहरातील मानोरा चौकात शुक्रवारी रात्री घडली.

रवी बोचरे व विनोद काळे रा. यवतमाळ अशी जखमींची नावे आहेत. ममता व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या माळ्यावर हे दोघेही जाहिरातीचे फलक लावत होते. त्यावेळी इमारतीवरून गेलेल्या विद्युत तारेत इमारतीचे लोखंडी रॉड गेल्याने विद्युत तारेतून आगीचे गोळे बाहेर पडले. फलक लावणाऱ्या या दोघांना जबर विजेचा झटका बसला. यात विनोद काळे हा चक्क तिसऱ्या माळ्यावरून खाली दुकानाच्या टिनशेडवर पडल्यामुळे मोठा आवाज झाला. तर रवी बोचरे याला अधिक प्रमाणात विजेचा धक्का लागल्याने शरीरावर अनेक ठिकाणी भाजले गेले आहे.

विजेचा झटका बसल्याने टिनशेडवर पडल्यामुळे आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमींना जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रवी बोचरे यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले

Web Title: Went up to advertise and got electrocuted