शेतकऱ्यांच्या परिश्रमावर निसर्गाने फेरले पाणी
By Admin | Updated: October 13, 2014 23:28 IST2014-10-13T23:28:34+5:302014-10-13T23:28:34+5:30
मागील १० वर्षात जिल्ह्याने आठवेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला आहे. यामध्ये यावर्षीचा निसर्ग प्रकोपाने पुन्हा भर घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरल्या गेले आहे.

शेतकऱ्यांच्या परिश्रमावर निसर्गाने फेरले पाणी
यवतमाळ : मागील १० वर्षात जिल्ह्याने आठवेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला आहे. यामध्ये यावर्षीचा निसर्ग प्रकोपाने पुन्हा भर घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरल्या गेले आहे. मोठ्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना प्रकोपामुळे दिवाळी अंधारात साजरी करावी लागणार आहे.
एकीकडे निवडणुकीने वातावरणात दिवाळीचा जल्लोष आत्तापासूनच सुरू झाला असताना शेतकऱ्यांच्या कुटुंबात मात्र अंधकार पसरला आहे. यातून शेतकरी काळजीत सापडला आहे. आपले गाऱ्हाणे कुणाकडे मांडायचे आणि आपल्या मदतीला कोण धावणार, असा पेचही शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारा कापूस दसऱ्यानंतर बाजारात येतो. यावर्षी पेरण्या लांबल्याने कपाशीचे पिकही लांबले आहे. अशातच विविध रोगांचे आक्रमण पिकांवर झाल्याने पहिल्याच वेचात कपाशी उलंगवाडीवर येईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे सोयाबीनही उन्हाच्या पाऱ्याने अपरिपक्व अवस्थेत करपले आहे. दोनही मुख्य नगदी पिकेच निसर्गाने हिरावून घेतल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा गंभीर पेच शेतकरी कुटुंबापुढे निर्माण झाला आहे. दिवाळी हा सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी घरात कुठलेही धान्य शिल्लक राहिले नाही.
निवडणुकीच्या झगमगाटात शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देण्यास कुणाकडेही वेळ नाही. सर्व अधिकारी, कर्मचारीसुद्धा निवडणूक प्रक्रियेत कार्यरत आहेत. शासनाच्या कोणत्याही कार्यालयात सध्या शेतकरी व सर्वसामन्यांचे कोणतेही कामे होताना दिसत नाही.
मग उत्तम परिस्थिती कशी महसूल प्रशासनाने नजर आणेवारीचा अहवाल नुकताच सादर केला. जिल्ह्याची आणेवारी सरासरी ५७ टक्के दर्शविण्यात आली.
याचा अर्थ पीक परिस्थिती उत्तम असल्याचा होतो. महसूली भाषेत ५० टक्क्यांच्या वर आणेवारी असल्यास स्थिती चांगली मानली जाते. प्रत्यक्षात शेतशिवार ओस पडताहेत अशा स्थितीत महसूल प्रशासनाने उत्तम परिस्थितीचा अहवाल सादर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचेच काम केले असल्याचे दिसून येत अहे. यातून ग्रामीण भागामध्ये संतापाची लाट पसरली आहे.
(शहर वार्ताहर)