३०० गावांत जलयुक्त शिवार
By Admin | Updated: December 31, 2014 23:30 IST2014-12-31T23:30:39+5:302014-12-31T23:30:39+5:30
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या ३०० गावांत ‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रम राबविला जाणार आहे.

३०० गावांत जलयुक्त शिवार
दिलासा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवा संकल्प
यवतमाळ : अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या ३०० गावांत ‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध योजना गावांमध्ये राबविल्या जाणार असून त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रमांतर्गत विहिरीचे अधिग्रहण आणि टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची निवड केली जाणार आहे. सिमेंट पोत्याचे बंधारे, ढाळीचे बंधारे, साखळी बंधारे आदींच्या माध्यमातून पाणी अडवून जिरविले जाईल. तालुका पातळीवर गावांची निवड करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली आहे. वनविभाग, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदींच्या माध्यमातून ही योजना यशस्वी करण्यात येईल. यासाठी स्वतंत्र निधी मिळणार नाही. मात्र संबंधित एजंसीला निधी निश्चितच वाढवून मिळणार आहे.सदर कार्यक्रम राबविण्यासाठी लोकप्रतिनिधींचीही मदत घेतली जाणार आहे. योजनेचे काम योग्यरीत्या होत आहे, की नाही यावर समितीच्या अध्यक्षांचे लक्ष राहणार असून दोषपूर्ण कामे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पाण्यासाठीचा खर्च पाण्यात जाणार नाही, यासाठी अधिकारी स्तरावर पूर्ण प्रयत्न केले जाणार आहे. यावर्षीचा पाणी टंचाई कृती आराखडा १० कोटींचा आहे. लोकांना पाण्यासाठी त्रास होणार नाही, यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेतले जाणार आहे.
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाला गती दिली जाणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिलेल्या सर्व विहिरी जून अखेरपर्यंत पूर्ण होतील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. कुठल्याही योजनेत गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी राजेश अडपावार, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते. (वार्ताहर)