गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST2021-04-05T05:00:00+5:302021-04-05T05:00:07+5:30
या ठिकाणी शहरातील विविध १६ व्यापाऱ्यांचे साहित्य ठेवले जाते. चार गोदामांत हे साहित्य ठेवण्यात आले होते. या गोदामामध्ये चप्पल, बूट, प्लास्टिक, ताडपत्र्या आणि स्टेशनरी साहित्य ठेवण्यात आले होते. सकाळी अचानक या गोदामाला आग लागली. या गोदामाची आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषदेची फायर यंत्रणा तात्काळ पोहोचली. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले होते. यानंतरही आग एका ठिकाणावरून दुसऱ्या गोदामाकडे सरकत गेली. तसा आगीचा चांगलाच भडका उडाला.

गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामाच्या मागील बाजूला असलेल्या गोदामाला रविवारी सकाळी आग लागली. या गोदामात असलेले लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. आगीचा प्रकोप इतका मोठा होता की, भिंती कोसळल्या, टीन वितळले. ही आग दुपारनंतरही धुमसत होती. आग नियंत्रणासाठी यवतमाळ, घाटंजी आणि दारव्हा येथील अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले होते.
रविवारी सकाळी ८.४५ वाजता मालानी गोदामाला आग लागली. या ठिकाणी शहरातील विविध १६ व्यापाऱ्यांचे साहित्य ठेवले जाते. चार गोदामांत हे साहित्य ठेवण्यात आले होते. या गोदामामध्ये चप्पल, बूट, प्लास्टिक, ताडपत्र्या आणि स्टेशनरी साहित्य ठेवण्यात आले होते. सकाळी अचानक या गोदामाला आग लागली. या गोदामाची आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषदेची फायर यंत्रणा तात्काळ पोहोचली. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले होते. यानंतरही आग एका ठिकाणावरून दुसऱ्या गोदामाकडे सरकत गेली. तसा आगीचा चांगलाच भडका उडाला. या ठिकाणची भिंत कोसळली, गोदामावर असलेले टीन आगीत वितळून गेले.
आग वाढत असल्याने बाजूच्या गोदामातील साहित्य इतरत्र हलविण्यासाठी मोठी धावपळ या ठिकाणी पाहायला मिळाली. या ठिकाणी असलेल्या चार गोदामांच्या बाजूला टाइल्स ठेवण्यात आल्या आहेत. त्यालाही फटका बसण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
चप्पल, बुटांचा साठा जळाल्याने धुराचे लोट
गोदामाला लागलेल्या आगीमध्ये बूट आणि चप्पलचा मोठा साठा जळाल्याने व्यापारी चांगलेच हादरले आहेत. तलाठ्यांनी या ठिकाणचा पंचनामा केला. लाखोंचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे. आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. दिवसभर अग्निशमन यंत्रणा आग विझविण्याचे प्रयत्न करीत होती. मात्र चप्पल, बुट हा रबरी तसेच कातडी माल जळाल्याने आग आटोक्यात आणणे कठीण गेले. या गोदामांमध्ये प्लास्टिकचा माल असल्याने आगीचे लोट दूरवर पसरले होते.