मजुरांची रोजगारासाठी भटकंती

By Admin | Updated: April 7, 2016 02:34 IST2016-04-07T02:34:05+5:302016-04-07T02:34:05+5:30

तालुक्यात कधी नव्हे एवढी बिकट परिस्थिती यावर्षी निर्माण झाली आहे. मजुरांना मजुरी मिळणे दुरापास्त झाले आहे़

Wandering for the wages of the laborers | मजुरांची रोजगारासाठी भटकंती

मजुरांची रोजगारासाठी भटकंती

पांढरकवडा तालुका : भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह सर्वच हवालदिल
नरेश मानकर पांढरकवडा
तालुक्यात कधी नव्हे एवढी बिकट परिस्थिती यावर्षी निर्माण झाली आहे. मजुरांना मजुरी मिळणे दुरापास्त झाले आहे़ दुष्काळामुळे गावात मजुरी नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे़
यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. शेतकऱ्यांकडे ज्या मजुरांना मजुरी मिळत होती, ती मजुरी त्यांना मिळणे कठीण झाले आहे. परिणामी मजुरांना गाव सोडून दुसऱ्या गावात मजुरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. एका गावावरून दुसऱ्या गावाला गेल्यानंतर त्या गावातही मजुरी नसल्यास पुन्हा मजुरांना दुसरीकडे जावे लागते़
गेल्यावर्षी नापिकी, बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, शेतीवर झालेला भरमसाठ खर्च, त्यातही कोपलेला निसर्ग, यामुळे संपूर्ण पिकांची विल्हेवाट लागली. परिणामी तालुक्यातील शेतकरी कमालीचे हतबल झाले. पुढील प्रपंच कसा चालवावा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तालुक्याची पीक परिस्थिती लक्षात घेता, कपाशीचे सरासरी उत्पन्न केवळ ५० किलो असल्याचे आढळून आले आहे.
यंदाच्या पीक परिस्थितीबाबत अनेक शेतकऱ्यांशी चर्चा केली असता, कपाशी बियाणे, मिश्रखत, नत्रखत, किटकनाशके, निंदन खर्च, लागवड व कापूस वेचाई, असा एकरी सहा ते साडेसहा हजार रूप्ये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यातच कापसाला योग्य भावही मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा लागवड खर्चदेखील निघाला नाही. तूर व सोयाबीनचीही तीच स्थिती आहे. दुष्काळाच्या छायेत शेतकरी असताना शासन कोणतीही उपाययोजना करीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरूद्ध असंतोष पसरला आहे. शेतकऱ्यांचीच परिस्थिती बिकट असल्यामुळे ते शेतातील कामावर मजूरही लावू शकत नाही़ मजुरांना द्यावयासाठी त्यांच्याजवळ पैसा नसल्यामुळे ते त्यांची मजुरी देईल, तरी कोठून ?, असा प्रश्न आहे़
कपाशीचे सरासरी उत्पन्न केवळ ५० किलो आहे. बियाणे, मिश्रखत, नत्रखत, कीटकनाशके, निंदण, लागवड व कापूस वेचाई, असा एकरी सहा ते साडेसहा हजार रूपये खर्च झाला. मात्र सरासरी उत्पन्न केवळ ५० किलो ते एक क्विंटल असल्याने शेतकऱ्यांना एकरी केवळ दोन हजार रूपयेच हातात आले. अर्थात चार हजार रूपये प्रति एकरी तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर कपाशी तरी, समाधानकारक होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. तथापि, एक-दोन वेचातच कपाशीची हिरवी झाडे वाळू लागली. कपाशीच्या पिकानेही दगा दिल्यामुळे शेतकरी कधी नव्हे एवढे यावर्षी खचून गेले आहेत.सध्या शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे. सततच्या ढगाळी वातावरणामुळे व अवकाळी पावसामुळे तुरीच्या पिकानेही दगा दिला. सोयाबीन व कपाशीच्या नापिकीमुळे आधिच खचलेले शेतकरी अधिकच चिंतीत झाले. गतवर्षी नेस्तनाबूत झालेले शेतकरी यावर्षी पुन्हा नापिकीच्या विळख्यात अडकल्याने पार उद्ध्वस्त झाले आहे. डोक्यावरील कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच प्रपंच कसा चालवायचा, मजुरांना मजुरी कोठून द्यावयाची, या प्रश्नांमुळे शेतकरी अधिकच खचून गेले आहे.
यावर्षीच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी शेतमालावरील खर्चासंबंधी हात आखडला असून त्याचा परिणाम मजुरांवर जाणवत आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे मजूर कामाच्या शोधात भटकताना दिसत आहे. यावर्षी उशिरा व अनियमित पावसामुळे जनावरांच्या वैरणाचीही पुरेपूर वाढ न झाल्याने व शेतकऱ्यांजवळ पुरेशा प्रमाणात कडबा, कुटार नसल्यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. जनावरांसाठी वैरण टंचाई व आर्थिक अडचण, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धष्टपुष्ट जनावरे विक्रीस काढली आहे. मजुरांनीही चार पैसे मागे टाकून घेतलेल्या बकऱ्या, गाई, कोंबड्या विक्रीस काढल्या आहे़ शेती कामे करणाऱ्या मजुरांवर आता इतरत्र जाऊन कोणतीही कामे करण्याची वेळ ओढवली आहे.

Web Title: Wandering for the wages of the laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.