“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:00 IST2025-06-22T18:58:43+5:302025-06-22T19:00:54+5:30
CM Devendra Fadnavis Replied Abu Azmi: आषाढी वारीतील पालख्यांबाबत अबू आझमी यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकते, असे म्हटले जात आहे.

“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
CM Devendra Fadnavis Replied Abu Azmi: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आषाढी वारी आणि संतांच्या पालख्यांबद्दल केलेल्या एका विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पत्रकारांशी बोलताना अबू आझमी यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले.
आतापर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा मशिदीतील काही लोक ५ ते १० मिनिटे रस्त्यावर नमाज पठण करतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केले, तर पासपोर्ट रद्द करू. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितले की, लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतो, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते, अशा आशयाचे विधान अबू आझमी यांनी केले.
फालतू वक्तव्याला उत्तर देणार नाही
अबू आझमी यांनी केलेल्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अबू आझमी यांना वादग्रस्त विधाने करण्याचा आवड आहे. वादग्रस्त विधान केले की, प्रसिद्धी मिळते असे त्यांना वाटते. त्यामुळे अबू आझमी यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नसल्यामुळे त्यांच्या फालतू वक्तव्याला उत्तर देणार नाही, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. तसेच राज्यात होणाऱ्या कुंभ मेळाव्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोड नेटवर्क तयार करण्यासाठी विनंती केली होती. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी बैठक घेत प्रमुख आठ रस्ते बनवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, दोन दिवसांच्या मुक्कामानंतर जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यातून मार्गस्थ झाली आहे. गेले दोन दिवस हजारो भाविकांनी पालख्यांचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटमार्गे सासवडला जाणार आहे.