Voter-backed candidate for Mahakashi development candidate at three and a half hundred | महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साडेतीनशेवर मतदारांचे पाठबळ

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साडेतीनशेवर मतदारांचे पाठबळ

ठळक मुद्देसंजय राठोड : विधान परिषदेसाठी सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या साडेतीनशेपेक्षा अधिक मतदारांचे पाठबळ असल्याचा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केला आहे.
विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ३१ जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत नागपूर येथील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने सोमवारी येथे महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी व सहकारी पक्षाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा मेळावा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना वनमंत्री संजय राठोड यांनी महाविकास आघाडी एकजूट असल्याने दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. ना. राठोड म्हणाले, जिल्ह्यातील २८० मते तर आपल्या आघाडीचीच आहेत. शिवाय एमआयएम, समाजवादी पार्टी, घाटी-घाटंजी विकास आघाडी, परिवर्तन आघाडी आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपल्या उमेदवाराला साडेतीनशेपेक्षा जास्त मते मिळतील. जिल्ह्यात मोठी विकास कामे करण्यासाठी दुष्यंत चतुर्वेदी यांना निवडून आणावे.
यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार ख्वाजा बेग, आमदार अ‍ॅड. इंद्रनील नाईक, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके, मनोहरराव नाईक, माजी आमदार वामनराव कासावार, विजयराव खडसे, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे आदींचीही भाषणे झाली.
मेळाव्याचे सूत्रसंचालन शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केले. यावेळी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या संध्याताई सव्वालाखे, माजी आमदार कीर्ती गांधी, जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, माधुरी अनिल आडे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, वसंतराव घुईखेडकर, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, राहुल ठाकरे, डॉ. मोहंमद नदीम, तातू देशमुख, देवानंद पवार, किशोर इंगळे, गजानन डोमाळे, नानाभाऊ गाडबैले, अनिल आडे, शैलेश ठाकूर, मनोज ढगले, अरुण राऊत, विलास देशपांडे, अनिल गायकवाड, यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्याची राजकीय परंपराच वेगळी -विजय दर्डा
यावेळी माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, राजकारणात यवतमाळ जिल्ह्याची परंपराच वेगळी आहे. लोक वेगवेगळ्या पक्षात असले तरी विकासासाठी सर्व जण एकदिलाने काम करतात. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हा एकोपा दाखवून देण्याची पुन्हा एक संधी आली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, तरुणांचे प्रश्न, उद्योगांचे प्रश्न सुटतील. जिल्ह्याचा विकास होण्यासाठी येथे उद्योग येणे आवश्यक आहे. त्यासाठी यवतमाळातील विमानतळ अनिल अंबानीच्या घशातून आपल्याला बाहेर काढायचे आहे. महाविकास आघाडीचे उमदेवार निवडून येतील यात शंकाच नाही. एकंदर ४९० मतदारांपैकी साडेतीनशे पेक्षा जास्त मते महाविकास आघाडीला मिळतील. शिवाय, भाजपाचीही काही मते आपल्यालाच मिळणार असल्याचे विजय दर्डा यांनी सांगितले.
मतदारांना आघाडीशी एकनिष्ठतेची शपथ
महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यासह सर्वांनी आघाडीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ मेळाव्यात घेतली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पांडे यांनी शपथ वाचन केले. तिन्ही पक्षाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांनी एकसुरात यावेळी शपथ ग्रहन केली. राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.

Web Title: Voter-backed candidate for Mahakashi development candidate at three and a half hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.