मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला उमरखेडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 11:12 IST2018-12-12T22:27:13+5:302018-12-13T11:12:39+5:30
मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये बुधवारी देण्यात आला.

मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला उमरखेडमध्ये
- अविनाश खंदारे
उमरखेड : मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये बुधवारी देण्यात आला. उमरखेडचे उपविभागीय महसूल अधिकारी स्वप्नील कापडनीस यांनी स्वप्नील कनवाळे या तरुणाला हा दाखला दिला. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर या समाजातील तरुणांना जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याची ओढ लागली होती. हे प्रमाणपत्र देणे आता सुरू झाले आहे. उमरखेडच्या एसडीओ कार्यालयाने मराठा जातीचे हे प्रमाणपत्र जारी केले. विदर्भातील हे पहिले प्रमाणपत्र असल्याचे एसडीओ कार्यालयातून सांगण्यात आले.
लवकरच ७२ हजार पदांची शासकीय नोकरभरती होणार आहे. तरुणाईला या भरतीचे वेध लागले आहेत. या भरतीत आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी मराठा समाजातील तरुण सरसावले आहे. त्यासाठीच त्यांनी मराठा जातीचे दाखले मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. बुधवारी एसडीओ स्वप्नील कापडनीस यांनी स्वत: स्वप्नील कनवाळे या तरुणाला मराठा जातीचा दाखला बहाल केला. यावेळी नायब तहसीलदार सुधीर देशमुख, शिवाजी माने, सचिन घाडगे, प्रवीण सूर्यवंशी, प्रवीण कलाने, विकास डोळस, भगाजी शिवरतवाड, अमोल भालेराव, भागवत माने आदी हजर होते.
दाखले सर्वत्र उपलब्ध
आगामी ७२ हजार पदांची मेगा भरती लक्षात घेता मराठा जातीचे दाखले सर्वच उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयातून जारी होत आहेत. मराठा समाजातील तरुण-तरूणींनी आपल्या जवळच्या एसडीओ कार्यालयात जाऊन हे दाखले प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन उमरखेडच्या एसडीओ कार्यालयाने केले आहे.