भाजीपाला उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST2021-08-26T05:00:00+5:302021-08-26T05:00:54+5:30
शेतकऱ्यांकडून मातीमोल दरात भाजीपाल्याची खरेदी होते आणि ग्राहकांना चढ्या दरात विकून व्यापारी दोन पैसे मिळवितात. या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होते. भाजीपाला दोन पैसे मिळवण्यासाठी लावला असताना खिशातूनच सर्व पैसे जातात. त्यात बदलत्या हवामानाने कीड नियंत्रण करणेही अशक्य होत आहे. व्यापारी नफा ठेवून शेतमालाची विक्री करतात. हा नियम शेतकऱ्यांसाठी मात्र पायदळी तुडवण्यात आला आहे.

भाजीपाला उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याच्या मार्गावर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परंपरागत पिकाला पर्याय म्हणून नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवड करण्यात येते. तत्काळ पैसे हातात येतात. या मोहापायी अनेक जण भाजीपाला लावतात, मात्र विक्रीसाठी गेल्यावर हातात पैसे येत नाहीत. उलट खिशातून पैसे जातात.
शेतकऱ्यांकडून मातीमोल दरात भाजीपाल्याची खरेदी होते आणि ग्राहकांना चढ्या दरात विकून व्यापारी दोन पैसे मिळवितात. या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होते. भाजीपाला दोन पैसे मिळवण्यासाठी लावला असताना खिशातूनच सर्व पैसे जातात. त्यात बदलत्या हवामानाने कीड नियंत्रण करणेही अशक्य होत आहे. व्यापारी नफा ठेवून शेतमालाची विक्री करतात. हा नियम शेतकऱ्यांसाठी मात्र पायदळी तुडवण्यात आला आहे. वाटेल त्या दरात शेतमालाची खरेदी करायची आणि ग्राहकांना नफा ठेवून विक्री करायची, असेच समीकरण आहे.
शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...
यावर्षी मी अडीच एकरमध्ये भाजीपाला लावला होता. वांगे दोन वेळेस जळाले. बरबटी दीड एकरामध्ये लावली आहे. त्याचा तोडण्याचा खर्च ७०० रुपये होता. हातात ५०० रुपयांची पट्टी आली.
- प्रवीण ठाकरे
भाजीपाला लावणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. साधा निंदणाचा खर्चही निघत नाही. हातात पाच पैसे पडत नाहीत. एखाद्या वेळेस भाव मिळतो, मात्र बारमाही भाजीपाल्याचे दर पडलेलेच असतात. याचा फायदा व्यापाऱ्यांनाच होतो. - अविनाश तिडके
ग्राहकांना परवडेना
कोरोनामुळे रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक पैसा महत्त्वाचा असताना महागड्या दरात भाजीपाला खरेदी करणे परवडत नाही. प्रत्येकांस आहारामध्ये विविध जीवनसत्त्व मिळविण्यासाठी भाजी घ्यावी लागते. - रोशनी देवकते
मुख्य बाजारपेठेतील शेतमालाचे दर आणि भाजी मंडीतील शेतमालाचे दर यामध्ये दरवेळेस मोठी तफावत पाहायला मिळते. याच प्रमुख कारणाने मोठ्या मंडीतून भाजीपाल्याची खरेदी होते.
- प्रियंका वानखडे
भावात एवढा फरक का?
भाजीपाल्याची खरेदी करताना त्याची बोली लावली जाते. ही बोली कमीत कमी किती रुपयांची असावी, याबाबत कुठलेही निर्बंध नाहीत. यामुळे व्यापारी वाटेल तितक्या दरापासून खरेदीसाठी सर्रास सुरू करतात. खरेदी झालेला शेतमाल विक्रीसाठी निर्बंध नाही. नफा ठरवून विक्री होते.