मुख्याधिकाऱ्यांसाठी यवतमाळात आत्मदहनाचा प्रयत्न; विविध सामाजिक संघटना रस्त्यावर

By सुरेंद्र राऊत | Published: September 12, 2022 06:17 PM2022-09-12T18:17:29+5:302022-09-12T18:26:45+5:30

सूड भावनेने केलेली बदली रद्दची मागणी

Various social organizations on the streets in support demanding annulment of vengeful transfer of municipal council chief yavatmal | मुख्याधिकाऱ्यांसाठी यवतमाळात आत्मदहनाचा प्रयत्न; विविध सामाजिक संघटना रस्त्यावर

मुख्याधिकाऱ्यांसाठी यवतमाळात आत्मदहनाचा प्रयत्न; विविध सामाजिक संघटना रस्त्यावर

googlenewsNext

यवतमाळ : येथील नगरपरिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची राजकीय सूड भावानेतून बदली करण्यात येणार आहे. याची माहिती मिळताच मडावी यांच्यास समर्थनार्थ यवतमाळकर नागरिक आक्रमक झाले. मडावी यांची बदली करू नये त्यांनाच मुख्याधिकारी म्हणून ठेवावे, या मागणीसाठी साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी माेर्चा काढला. तिथे एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्राेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पाेलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. तर एका युवकाने निषेध म्हणून मुंडण करून घेतले. काही युवकांनी आमरण उपाेषणाचा इशारा दिला आहे. 

मुख्याधिकारी मडावी यांची बदली हाेणार याची चर्चा शहरभर सुरू झाली. समाज माध्यमावर तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या. आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी आंदाेलनाचा इशारा दिला. इतकेच नव्हे तर अनेकांनी वैयक्तिक आंदाेलन सुरू केले आहे. साेमवारी दुपारी संविधान चाैकातून आंदाेलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बदली रद्दची मागणी केली. यावेळी बाळासाहेब जयसिंगपुरे यांनी अंगावर पेट्राेल घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सतीश बाेरकर या युवकाने मुंडण करून आपला निषेध नाेंदविला. या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टी, प्रहार जनशक्ती पक्ष, संभाजी ब्रिगेड यासह विविध सामाजिक राजकीय संघटनांनी सहभाग घेतला. कॉंग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा निघाला. त्यातसुद्धा माधुरी मडावी यांची बदली रद्दची मागणी करण्यात आली.

यवतमाळ नगरपरिषदेतील राजकीय वादामुळे शहराची बकाल अवस्था झाली हाेती. दैनंदिन कामही हाेत नव्हते. वर्षभरापूर्वी माधुरी मडावी मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यांनी येथे कर्मचारी संख्या कमी असतानाही याेग्य नियाेजन करत कामांचा धडाका लावला. शहर स्वच्छतेसह साैदर्यीकरणाचे उपक्रम हाती घेतले. जनसामान्य नागरिकांचा पूर्णवेळ उपलब्ध असल्याने मडावी यांच्यावरचा विश्वास वाढत गेला. त्यांनी राबविलेल्या धडक माेहिमेमुळे शहर स्वच्छता झाली, उजाड उद्यान पूर्ववत हाेऊ लागली.

शहरातील अनेक रस्त्यावरचे अतिक्रमण काढल्याने त्यांनी माेकळा श्वास घेतला. कधी नव्हे ते सफाई कामगार हातात झाडू घेऊन काम करू लागले. काम करावे लागत असल्याने मडावी यांना काहींनी चक्क धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र यालाही त्या जुमानल्या नाही. शहरातील आजपर्यंत न सुटलेली माेकाट वराहाची समस्यासुध्दा त्यांनी निकाली काढली. या सर्व कामांमुळे एक गट त्यांच्या विराेधात गेला़. त्यांनी स्थानिक लाेकप्रतिनिधीला हाताशी धरून माधुरी मडावी यांची बदली करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्याकडे शिफारस केली.

नगर परिषदेसमाेर उपाेषण 

माधुरी माडावी यांची बदली रद्द व्हावी यासाठी अशाेक उर्फ गाेलू भीमराव डेरे, हेमंत मुकींदराव कांबळे या युवकांनी उपाेषण सुरू केले आहे. बदली आदेश रद्द हाेत नाही ताेपर्यंत आंदाेलन सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

यवतमाळात पहिल्यांदा अधिकाऱ्यासाठी आंदाेलन 

प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची बदली रद्द व्हावी, यासाठी यवतमाळ शहरात पहिल्यांदाच सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. तीव्र शब्दात स्थानिक लाेकप्रतिनिधीचा निषेध केला जात आहे. केवळ राजकीय सुडातून चांगल्या अधिकाऱ्याची बदली केली जात असल्याचा आराेप हाेत आहे. ही यवतमाळच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

Web Title: Various social organizations on the streets in support demanding annulment of vengeful transfer of municipal council chief yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.