जिल्ह्याला अवकाळीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST2021-03-24T05:00:00+5:302021-03-24T05:00:02+5:30
खरिपातील नुकसान भरून काढता यावे, म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची लागवड केली. या स्थितीत कॅनॉल क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. हे वेळापत्रक लांबले. यातून रब्बीचे पीक काढणीला येण्याचा कालावधी लांबला. याच लांबलेल्या कालावधीत अवकाळी पावसाने झडप घातली. एक वेळेस पाऊस येऊन थांबला नाही. पाच दिवस पाऊस बरसला आहे. पाच दिवसांमध्ये सरासरी १२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

जिल्ह्याला अवकाळीचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसाने शेत शिवारात मोठे नुकसान झाले आहे. यात हळद, गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान विभागाने आणखी दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहे. सततचे नुकसान होत असताना शेत शिवारातून नुकसानीचा अहवाल अद्यापही पुढे आला नाही. यामुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळणार किंवा नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात या वर्षी खरिपाच्या पेरणीपासूनच कृषी क्षेत्रावर मोठे संकट घोंगावत आहे. खरिपातील नुकसान भरून काढता यावे, म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची लागवड केली. या स्थितीत कॅनॉल क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. हे वेळापत्रक लांबले. यातून रब्बीचे पीक काढणीला येण्याचा कालावधी लांबला. याच लांबलेल्या कालावधीत अवकाळी पावसाने झडप घातली. एक वेळेस पाऊस येऊन थांबला नाही. पाच दिवस पाऊस बरसला आहे. पाच दिवसांमध्ये सरासरी १२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
सतत झडी स्वरूपाच्या पावसाने गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवेच्या वेगाने गहू आडवा झाला. पडलेल्या पावसाने गहू काळा पडण्याची दाट शक्यता आहे. असाच फटका रब्बीच्या ज्वारीला बसण्याचा धोका आहे. ज्वारी परिपक्व अवस्थेत आहे. त्या सुमारास पाऊस बरसल्याने ही ज्वारी काळी पडण्याचा धाेका वाढला आहे. मक्याच्या पिकाचे पावसाने नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड झाली. हळद काढणीच्या अवस्थेत आहे. शेतात हळद शिजविण्याचे काम सुरू आहे. ही हळद शेत शिवारातच वाळू घातली जाते. मधातच पाऊस बरसल्याने हळदीला डाग पडण्याची शक्यता आहे. पावसाने भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालेभाज्या सडत आहे. यामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र नुकसान आले आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण अद्यापही झाले नाही.
मजूर टंचाई आणि यंत्राच्या कमतरतेने धोका
जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी यंदा गव्हाची पेरणी उशिरा केली होती. त्यामुळे अनेकांचा गहू सोंगणी अभावी शेतातच आहे. या पिकाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. तर गहू काढणीसाठी अनेकांना मजूर मिळाले नाही. तर अनेक शेतकरी हार्वेस्टरची प्रतीक्षा करीत आहे. त्यातच अचानक आलेल्या पावसाने हाताशी आलेले पीक उद्ध्वस्त केले. गव्हासह हरभरा, आंबा, भाजीपाला या पिकांसह खेड्यातील घरादारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.