रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST2019-08-26T06:00:00+5:302019-08-26T06:00:11+5:30
हर्षीनजीक वळणावर त्याच्या भरधाव दुचाकीला रानडुकराने जबर धडक दिली. या अपघातात प्रकाशच्या डोक्याला गंभीर मार बसला. त्याला तातडीने नांदेड येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : भरधाव मोटरसायकलला रानडुकराने जबर धडक दिली. या अपघातात तरुण ठार झाला. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजता हर्षीनजीक मोठ्या हनुमानाजवळ घडली.
प्रकाश देवराव मोरे (३०) रा. नागवाडी ता. पुसद असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील नागवाडी येथील रहिवासी प्रकाश देवराव मोरे हा पुसदच्या फुपाटे हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून कार्यरत होता. शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास प्रकाश आपल्या दुचाकीने नागवाडीवरून पुसदकडे ड्युटीसाठी निघाला होता. मात्र हर्षीनजीक वळणावर त्याच्या भरधाव दुचाकीला रानडुकराने जबर धडक दिली. या अपघातात प्रकाशच्या डोक्याला गंभीर मार बसला. त्याला तातडीने नांदेड येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नागवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डॉ. हरिभाऊ फुपाटे, डॉ. आरती फुपाटे, भाऊ चौरे उपस्थित होते.
मनमिळावू स्वभावाच्या प्रकाशच्या निधनाने नागवाडीवर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. प्रकाश हा कुटुंबीयांचा आधार होता. त्याच्या निधनाने मोरे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.