उमरखेड बसस्थानकासमोर ट्रकने तरुणास चिरडले
By Admin | Updated: September 3, 2016 00:25 IST2016-09-03T00:25:12+5:302016-09-03T00:25:12+5:30
भरधाव ट्रकने तरुणाला चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास येथील बसस्थानकासमोर घडली.

उमरखेड बसस्थानकासमोर ट्रकने तरुणास चिरडले
देह चेंदामेंदा : ठाणेदाराने उचलले प्रेत
उमरखेड : भरधाव ट्रकने तरुणाला चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास येथील बसस्थानकासमोर घडली. ट्रकच्या चाकाखाली चेंदामेंदा झालेला मृतदेह ठाणेदारांनाच उचलावा लागला.
संतोष दत्ता शिंदे (३५) रा. वडद ता. महागाव असे मृताचे नाव आहे. तो शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास येथील बसस्थानकासमोरुन जात होता. त्याच वेळी मागून आलेल्या ट्रकने (एम.एच.२३-सी-५६५७) दत्ताला चिरडले. ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून आणि शरीरावरून गेले. त्यामुळे त्याचा छिन्नविछेन्न मृतदेह रस्त्यावर विखुरला. बघ्यांची मोठी गर्दी झाली. या घटनेची माहिती उमरखेडचे ठाणेदार अनिल पाटील यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यावेळी मृतदेह अर्धा ट्रकच्या चाकात अडकलेला होता. ठाणेदार अनिल पाटील यांनी उपस्थितांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. परंतु कुणीही पुढे येत नव्हते. अखेर ठाणेदारांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक विनायक रामोड व माधव वाढवे यांच्या मदतीने स्वत: प्रेत गोळा केले. यावेळी नागरिक मात्र बघ्याची भूमिका घेऊन उभे होते. पोलिसांनीच माणूसकीचा प्रत्यय देत त्याचा मृतदेह रुग्णालयात नेला. (शहर प्रतिनिधी)