४० हजार दूरध्वनींची ‘ट्रिंग ट्रिंग’ थांबली
By Admin | Updated: May 17, 2015 00:02 IST2015-05-17T00:02:03+5:302015-05-17T00:02:03+5:30
संपर्काचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून दूरसंचार सेवेला प्राधान्य दिले जाते. असे असले तरी, या महत्त्वपूर्ण सेवेकडे केंद्र...

४० हजार दूरध्वनींची ‘ट्रिंग ट्रिंग’ थांबली
रुपेश उत्तरवार यवतमाळ
यवतमाळ : संपर्काचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून दूरसंचार सेवेला प्राधान्य दिले जाते. असे असले तरी, या महत्त्वपूर्ण सेवेकडे केंद्र शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळेच आयुर्मान संपल्यानंतरही दूरसंचार सेवेतील जुनी यंत्रसामुग्री बदलविली गेली नाही. परिणामी सेवा खंडित होवून ग्राहकच संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले. ‘ईस रूट की सभी लाईने अभी खराब है’ ही नेहमीची अडचण ग्राहक दूर जाण्याचे मोठे कारण ठरली. वैतागलेल्या ग्राहकांनी लँडलाईन फोन बंद केले. जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार टेलिफोन ग्राहकांनी बंद केले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात दूरध्वनी सेवा सुरू होऊन अर्धे शतक पूर्ण झाले. प्रारंभीच्या काळात दूरध्वनी सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांना रांगा लावाव्या लागत होत्या. एक ते दोन वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर दूरध्वनी क्रमांक ग्राहकांना मिळत होता. यामुळे दूरध्वनी घरात असणे एकेकाळी प्रतिष्ठेचे मानले जात होते. आज दूरसंचार विभागाचा हाच दूरध्वनी ग्राहकांची डोकेदुखी ठरत आहे. याला अनेक बाबी कारणीभूत आहे.
भारत संचार निगमची सेवा केंद्र शासनामार्फत चालविली जाते. या सेवेने मागणी वाढताच वितरण व्यवस्थेकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. बीएसएनएलचे जाळे वाढत असतानाच या विभागाकडून जिल्ह्यांना लागणारी यंत्रसामुग्री पुरविण्यासाठी मोठा विलंब होत आहे. यातून बीएसएनएलचे ग्राहक तुटले आहेत. एकेकाळी ६० हजारांचा घरात टेलिफोन जिल्ह्यात होते. सद्यस्थितीत १९ हजार ६२० ग्राहक शिल्लक राहिले आहेत. जवळपास ४० हजार ग्राहकांनी दूरध्वनी सेवा बंद केली आहे. त्याऐवजी ग्राहकांनी खासगी कंपनीची सेवा घेणे पसंत केले आहे. बीएसएनएलच्या मोबाईल सेवेची हीच अवस्था आहे. टेलिफोनप्रमाणे या कंपनीचे ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळत आहेत. मोबाईल सेवेमध्येही ७० हजार ग्राहकांनी आपली सेवा बदलविली आहे. सद्यस्थितीत एक लाख दहा हजार ग्राहकांजवळ बीएसएनएलचे सीमकार्ड आहेत. या कंपनीची सेवा सदोष मिळत असल्याने पर्यायी व्यव्यस्थाही अनेक ग्राहकांनी केली आहे. इतर एखाद्या कंपनीचे सीमकार्ड मोबाईलमध्ये टाकले आहेत.
इंटरनेटचा वापर करता यावा म्हणून ब्रॉडबॅन्ड सेवेसाठी बीएसएनएलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सेवेला गती नसल्याने ग्राहक नाराज आहेत. सद्यस्थितीत सहा हजार १७६ ब्रॉडबॅन्ड कनेक्शन आहेत. यावरून इंटरनेट जोडण्यात येते. याला हवी तशी गती मिळत नाही. यामुळे ग्राहकांनी कार्यालयाशी वारंवार संपर्क साधला. परंतु वरिष्ठ कार्यालयाने कुठलीही दुरुस्ती केली नाही. संपूर्ण जिल्ह्यातील संपर्कक्षेत्र वाढावे म्हणून मोबाईल टॉवर बसविण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. असे असले तरी, सद्यस्थितीत १७६ मोबाईल टॉवर कार्यान्वित आहेत. ५० मोबाईल टॉवर्स संपर्कक्षेत्र काबीज करण्यासाठी लागण्याची शक्यता आहे. असे असले तरी, सध्या १२ नवीन मोबाईल टॉवरला मंजुरी देण्यात आली आहे. यावरून सेवा अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
भारत संचारच्या टॉवरवर खासगीचे कव्हरेज
दूरसंचार विभागाने संपर्क मिळविण्यासाठी ग्रामीण भागात टॉवर उभारले आहेत. मात्र खासगी कंपन्यांचे अद्यापही काम अर्धवटच आहे. अशा काही कंपन्या भारत संचारच्या टॉवरवरून कव्हरेज मिळवत आहे. भारत संचारच्या टॉवरवर क्षमतेपेक्षा अधिक भार वाढला. परिणामी याच कंपनीच्या ग्राहकांना सेवा देण्यात प्रचंड अडथळ्यातून मार्ग काढावा लागत आहेत.
खोदकामाने इंटरनेट कनेक्शन कोलमडले
शासकीय कार्यालयांमध्ये होणारे कामकाज सगणकाच्या माध्यमातून होत आहे. यासाठी इंटरनेटचा वापर होतो. रस्त्याच्या कामामुळे दूरसंचार विभागाच्या तारा जागोजागी तुटल्या आहेत. यामुळे विविध कार्यालयातील गोपनीय माहिती उघड होण्याचा धोका वाढला आहे. इतकेच नव्हे तर, टेलिफोनही बंद पडले आहेत. यातून भारत संचार निगमचा आर्थिक महसूल बुडाला आहे. यावर कारवाई करण्याची मागणी दूरसंचार निगमने केली आहे. मात्र कुठली कारवाई झाली नाही.
...तर महसुलात
भक्कम भर
दूरसंचार निगमला ग्राहकांची पहिली पसंती आहे. नानाविध अडचणींमुळे ग्राहकांनी आपली सेवा बंद केली आहे. यानंतरही दूरसंचार निगमला महिन्याकाठी सव्वादोन कोटींचा महसूल मिळतो. भारत संचार निगमने आपल्या उणिवा दूर केल्यास महसुलात भक्कम वाढ होईल. त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.