वणी तालुक्यात पुरात तिघे वाहून गेले; महिलेचा मृत्यू, दोघे बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 09:26 PM2020-07-09T21:26:25+5:302020-07-09T21:26:42+5:30

गुरूवारी सायंकाळी अचानक डोर्ली परिसरात धुव्वादार पाऊस बरसला. त्यामुळे डोर्ली गावालगत असलेल्या नाल्याला प्रचंड पुर आला. बैलजोडीचा पाण्यात बुडून अंत झाला.

Three were swept away in the floods in Wani taluka; Woman died, two missing | वणी तालुक्यात पुरात तिघे वाहून गेले; महिलेचा मृत्यू, दोघे बेपत्ता 

वणी तालुक्यात पुरात तिघे वाहून गेले; महिलेचा मृत्यू, दोघे बेपत्ता 

googlenewsNext

वणी (यवतमाळ) : तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया डोर्ली गावालगतच्या नाल्याला आलेल्या पुरात तीन बैलबंड्या अचानक वाहून गेल्या. यात बैलबंडीमध्ये बसून असलेले तिघेजण वाहून गेले. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोघे अद्यापही बेपत्ता आहे. बैलबंडीला जुंपून असलेली एक बैलजोडीही या दुर्घटनेत मरण पावली. ही घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.


मिना मारोती कुडमेथे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. विनायक झोलबा उपरे (४७) व हरिदास रामा खाडे (४८) हे पुरात वाहून गेले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याच पुरात मनीषा प्रशांत सिडाम आणि मीना मनोहर सिडाम या दोन महिला वाहून गेल्या होत्या. मात्र काही अंतरावर त्या सुखरूप आढळल्या. त्यांना उपचाराकरिता दवाखान्यात भरती केले आहे. 


गुरूवारी सायंकाळी अचानक डोर्ली परिसरात धुव्वादार पाऊस बरसला. त्यामुळे डोर्ली गावालगत असलेल्या नाल्याला प्रचंड पुर आला. याचदरम्यान शेतातून चार बैलबंड्या गावाकडे परत येत असताना त्या नाल्यात उतरल्या. पुराचा अंदाज न आल्याने तीन बैलबंड्या अचानक प्रवाहात उलटल्या. नाल्याला ओढा अधिक असल्याने बैलबंडीतील मिना कुडमेथे, विनायक उपरे व हरिदास खाडे हे तिघेहीजण प्रवाहात वाहून गेले. यापैकी शोध मोहिमेदरम्यान मिना कुडमेथेचा मृतदेह हाती लागला, तर विनायक उपरे व हरिदास खाडे या दोघांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती सरपंच विजय दादाजी टोंगे यांनी ‘लोकमत’ला दिली. या दुर्दैवी घटनेत विनायक उपरे यांची मालकीच्या बैलजोडीचाही पाण्यात बुडून करूण अंत झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, तहसीलदार श्याम धनमने, गटविकास अधिकारी राजेश गायनर, शिरपूरचे ठाणेदार अनिल राऊत व पोलीस ताफा डोर्लीत दाखल झाला. मात्र घटनास्थळ गावापासून काही अंतरावर व अतिशय दुर्गम असल्याने रात्रीच्या अंधारात बेपत्ता लोकांचा शोध घेणे अवघड होऊन बसले होते.

Web Title: Three were swept away in the floods in Wani taluka; Woman died, two missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस