यवतमाळ जिल्ह्यात एकाच कुटुंबात तिसरी शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 10:48 IST2018-01-10T10:47:38+5:302018-01-10T10:48:37+5:30
शेतकऱ्यांचे अर्थकारण किती डबघाईला आले आहे, याचे ज्वलंत उदाहरण तालुक्यातील जरूर गावात समोर आले आहे. शेतीच्या नापिकीपायी घरातील दोघांची आत्महत्या पाहिलेल्या उईके कुटुंबातील तिसऱ्या कर्त्या पुरुषानेही सोमवारी आत्महत्या केल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात एकाच कुटुंबात तिसरी शेतकरी आत्महत्या
:लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: शेतकऱ्यांचे अर्थकारण किती डबघाईला आले आहे, याचे ज्वलंत उदाहरण तालुक्यातील जरूर गावात समोर आले आहे. शेतीच्या नापिकीपायी घरातील दोघांची आत्महत्या पाहिलेल्या उईके कुटुंबातील तिसऱ्या कर्त्या पुरुषानेही सोमवारी आत्महत्या केल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे.
सोमवारी जरूर गावातील रहिवासी जनार्दन महादेव उईके (५०) यांनी नापिकीला कंटाळून स्वत:च्याच शेतातच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. उईके कुटुंबातील ही तिसरी आत्महत्या आहे. यापूर्वी त्यांचा लहान भाऊ अशोक महादेव उईके आणि पुतण्या सुदर्शन अशोक उईके या दोघांनीही कर्जापायीच आत्महत्या केली. अशोकने चार वर्षांपूर्वी तर सुदर्शनने पाच वर्षांपूर्वी मृत्यूला कवटाळले. आता जनार्दनवर संपूर्ण जबाबदारी असताना त्यानेही आत्महत्या केली. जनार्दनने यंदा कापसाची पेरणी केली होती. मात्र बोंडअळीच्या आक्रमणाने संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले होते. कर्जमाफीच्या यादीत त्याचे नाव आहे. मात्र अद्यापही त्याला लाभ मिळालेला नाही. याच निराशेतून जनार्दनने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. शेतीतून काहीच पीक हाती येत नसल्याने एखाद्या कुटुंबातील तीन जीव गेल्याच्या या विदारक घटनेने तालुका हळहळतो आहे.