लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनावर घेतलेल्या उपचाराचा कमी खर्च देणाऱ्या दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या यवतमाळ येथील वीर वामनराव चौक शाखेला जिल्हा ग्राहक आयोगाने चांगलाच दणका दिला. दिलेली रक्कम योग्य कशी, हे कंपनीने सिद्ध केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला उपचारासाठी लागलेली पूर्ण रक्कम देण्यात यावी, असा आदेश यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने दिला.
यवतमाळ येथील सरिता संजीव बाजोरिया यांनी कोरोनाकाळात दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून पाच लाख रुपये दायित्व असलेली कोरोना कवच पॉलिसी काढली होती. कोरोनाची लक्षणे निघाल्याने त्यांना या आजारावर उपचार घ्यावा लागला. ही रक्कम मिळावी यासाठी त्यांनी विमा कंपनीकडे आवश्यक ती सर्व माहिती सादर केली. परंतु झालेला पूर्ण खर्च कंपनीने नाकारला.
८१ हजार रुपये कमी दिले सरिता बाजोरिया यांना कोरोना उपचाराचा एकूण एक लाख ५७ हजार खर्च आला. विमा कंपनीने प्रत्यक्षात ७५ हजार ७३० रुपये एवढीच रक्कम त्यांना दिली. उर्वरित ८१ हजार ६५८ रुपये मिळावे, यासाठी त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. बाजोरिया यांना दिलेली रक्कम योग्य कशी आहे हे सिद्ध करण्याचे प्राथमिक दायित्व कंपनीचे होते.
परंतु लेखी जबाबात नमूद करण्याव्यतिरिक्त कोणताही समाधानकारक पुरावा कंपनीने सादर केला नाही, असे आयोगाने निकालपत्रात नमूद केले आहे. या निकालामुळे तक्रारकर्त्याला दिलासा मिळाला आहे.
आठ टक्के व्याजासह रक्कम द्या
- यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. त्यामध्ये कंपनीने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब आणि ग्राहक सेवा देण्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले.
- यानंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला. कंपनीने बाजोरिया यांना ८१ हजार ६५८ रुपये आठ टक्के व्याजासह द्यावे, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता १५ हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावे, असा आदेश दिला आहे.