ऐन हिवाळ्यात रक्तटंचाई
By Admin | Updated: December 4, 2015 02:30 IST2015-12-04T02:30:37+5:302015-12-04T02:30:37+5:30
एरव्ही उन्हाळ्यात रक्त टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय ...

ऐन हिवाळ्यात रक्तटंचाई
शासकीय रक्तपेढी : रुग्णांची होतेय फरफट
यवतमाळ : एरव्ही उन्हाळ्यात रक्त टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त पेढीत यंदा चक्क हिवाळ्यातच रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्या सारखी स्थिती आॅक्टोबर ते डिसेंबर महिन्यात निर्माण झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीने विदर्भात रक्त संकलनाचा कीर्तीमान निर्माण केला आहे. जनजागृतीच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्वही पटवून दिले आहे. त्यामुळेच तब्बल ११ महिन्यात ११२ रक्तदान शिबिर घेता आले. यातून दहा हजार रक्त पिशव्या संकलित झाल्या. मागीलवर्षी संपूर्ण वर्षभरात दहा हजार २०० रक्त पिशव्यांचे संकलन झाले होते. जिल्ह्यातील सामाजिक संघटना, विविध महाविद्यालये आणि इतर संस्था यांची संख्या लक्षात घेता संकलनाचा हा आकडा विक्रमी मानला जातो. त्या तुलनेत नागपूरसारख्या महानगरामध्येही एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त संकलन होत नाही. एकीकडे रक्तसंकलनाची ही आशादायी वाटचाल असतानाच दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्य रुग्णाला वेळेवर रक्तच मिळत नाही. डॉक्टरांनी रक्तपेढीत पाठविल्यानंतर रक्त उपलब्ध आहे, असा प्रकार अपवादानेच घडताना दिसून येतो. जिल्ह्यातील ग्रामीण जनतेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हेच एक आशास्थान आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती आर्थिक परिस्थिती नसताना जगण्याची उमेद घेऊन या रुग्णालयात येतो. खऱ्या गरजू रुग्णांना आपले रक्त वेळेत कामी पडावे, हा उदात्त हेतू ठेवून अनेक रक्तदाते शासकीय पेढीतच रक्तदान करण्यास पुढाकार घेतात. पण दुर्दैवाने येथील नियोजनशून्यतेमुळे गरज भासल्यास सामान्य रुग्णाला रक्त उपलब्ध होईलच याची शाश्वती नाही. गेल्या काही महिन्यांपासून याचा फटका सामान्य रुग्णांना बसत आहे.
दिवाळीच्या सुटीचा कालावधी आणि परीक्षेचा कालावधी असल्यामुळे या काळात रक्त संकलन शिबिर घेता आले नाही, अशी सबब पुढे केली जाते. मुळात हा सर्व भाग लक्षात घेऊनच शिबिरांच्या आयोजनाचे नियोजन करण्यात येते. अशा सुटी व परीक्षेच्या काळात विविध राजकीय, सामाजिक व इतर संघटनांकडून रक्त संकलन शिबिराचे आयोजन करून घेणे अपेक्षित आहे. जेणेकरून या काळात रुग्णांना रक्त उपलब्ध होईल. याचे नियोजन चुकले आहे. त्यामुळेच हा तुटवडा जाणवतो. शिवाय रक्त उपलब्ध असल्यानंतर त्याचा वापरही आवश्यकता न पाहता केला जातो. केवळ एकाची मर्जी सांभाळून इतरांची हेळसांड करण्याचा प्रकार येथे सुरू आहे. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांचीही जाणीवपूर्वक डोळेझाक असल्याने सर्वसामान्य रुग्णांना येथे कोणी वालीच उरला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)