चोरीचा कोळसा खरेदीदार आता ‘एलसीबी’च्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:35 IST2018-03-31T22:35:37+5:302018-03-31T22:35:37+5:30

कोळशाने भरलेल्या ट्रकमधील कोळसा रस्त्यावर सांडवून नंतर तो येथील लालपुलिया परिसरातील काही ठराविक कोळसा व्यावसायिकांकडे विकण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.

 Theft Coal Buyer Now On The Lcb Radar | चोरीचा कोळसा खरेदीदार आता ‘एलसीबी’च्या रडारवर

चोरीचा कोळसा खरेदीदार आता ‘एलसीबी’च्या रडारवर

ठळक मुद्देलाखोंची उलाढाल : लालपुलिया परिसरात चालतो व्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : कोळशाने भरलेल्या ट्रकमधील कोळसा रस्त्यावर सांडवून नंतर तो येथील लालपुलिया परिसरातील काही ठराविक कोळसा व्यावसायिकांकडे विकण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. कोळसा चोरीच्या विषयात ‘लोकमत’ने मालिका प्रकाशित केल्यानंतर या चोरीवर पायबंद घालण्यासाठी यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे.
चार दिवसांपूर्वी लालपुलिया परिसरात एलसीबीच्या पथकाने टाकून चार पिक-अप वाहनांसह चालकांना अटक केली होती. कोळसा खाणींमधून निघालेल्या ट्रकमधून रस्त्यांमध्ये आम्ही कोळसा खाली पाडतो व नंतर तो आमच्या वाहनांमध्ये भरून लालपुलिया परिसरातील काही ठराविक प्लॉटवर तो कोळसा विकतो, अशी कबुलीच पिक-अप वाहनांच्या चालकांनी एलसीबीच्या पथकापुढे दिली. गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू असल्याचे एलसीबीच्या लक्षात आल्यानंतर आता चोरीचा कोळसा विकत घेणारे व्यापारी एलसीबीच्या रडारवर आहेत. येत्या काही दिवसांत कोळसा चोरी प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एलसीबीचे निरीक्षक मुकुंद कुळकणी हे अनेक वर्षे वणीच्या ठाणेदारपदी होते. त्यामुळे त्यांचा या विषयातील अभ्यास दांडगा आहे. कोळसा चोरीच्या विषयात ‘लोकमत’ ने मालिका प्रकाशित केल्यानंतर वेकोलिचे प्रशासन अस्वस्थ झाले. वेकोलितील काही घरभेद्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लाखो रुपयांचा कोळसा खाणीतून पळविला गेला. मात्र ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर कोळसा तस्कर भूमिगत झाले असून सध्या तरी मोठ्या चोºयांना चाप बसला आहे. राजकीय आश्रयाखाली कोळशाची ही चोरी सुरू होती. काही पदाधिकारीही यात सामिल होते.
वेकोलिने खाणीतील सुरक्षा वाढविली
‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर वेकोलि प्रशासनाने कोळसा खाणींच्या सुरक्षेत वाढ केली आहे. कोळसा चोरीच्या विरोधात मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:  Theft Coal Buyer Now On The Lcb Radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.