बेरोजगार भडकले; शिक्षक भरतीसाठी समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 19:53 IST2023-06-16T19:52:30+5:302023-06-16T19:53:11+5:30
Yawatmal News राज्य शासन शिक्षक भरतीकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे एकाच टप्प्यात २०१९ पासून लटकलेली शिक्षक भरती त्वरित पूर्ण करण्यात यावी, अन्यथा २३ जून रोजी समृद्ध महामार्ग रोखून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेरोजगारांनी दिला.

बेरोजगार भडकले; शिक्षक भरतीसाठी समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा
यवतमाळ : राज्य शासन शिक्षक भरतीकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे एकाच टप्प्यात २०१९ पासून लटकलेली शिक्षक भरती त्वरित पूर्ण करण्यात यावी, अन्यथा २३ जून रोजी समृद्ध महामार्ग रोखून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेरोजगारांनी दिला.
यासंदर्भात डीएड, बीएडधारक उमेदवारांनी शुक्रवारी सर्व जिल्हास्तरावरून राज्यशासनाला निवेदन पाठविले. यवतमाळ जिल्हा परिषदेत शुक्रवारी दुपारी हे निवेदन घेऊन बेरोजगारांचा जमाव एकत्र आला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत यावेळी शासनाला निवेदन देण्यात आले. फेब्रुवारी २०२३ मध्ये अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. पण अजूनही पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी रोष व्यक्त केला.
५५ हजार शक्षक पदांची भरती एकाच टप्प्यात करावी, विभागीय भरती करू नये, सर्व संवर्गातील उमेदवारांना आरक्षणनिहाय न्याय देण्यात यावा, २०१७ मधील अर्धवट राहिलेली भरती तत्काळ पूर्ण करण्यात यावी, न्यायालयात सादर केलेल्या रोडमॅपनुसार पवित्र पोर्टलला तत्काळ नोंदणी सुरू करावी, एकदा निवडलेला उमेदवार पोर्टलमधून पुढील निवडीसाठी बाद करण्यात यावा, उमेदवारांची प्रतीक्षा यादी लावावी, उर्दू माध्यमाच्या किमान तीन हजार जागा भरण्यात याव्या आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्तांना पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी युनिक अकॅडमीचे सचिन राऊत, चेस स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रशांत मोटघरे, सुकेश काजळे, रुपेश काटकर, शुभम गावंडे, मुकेश झोडे, पवन देवतळे, प्रतिक लोखंडे, विशाल ठाकरे आदी उपस्थित होते.
२३ जूनचा अल्टीमेटम
शिक्षक भरतीची प्रक्रिया २३ जूनपर्यंत सुरू करण्यात यावी, असा अल्टीमेटम निवेदनातून देण्यात आला आहे. तोपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २३ जून रोजी समृद्ध महामार्ग रोखण्यासह बेमुदत उपोषण, सामूहिक जलसमाधी, अर्धनग्न आंदोलन अशा स्वरुपाचे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उमेदवारांनी दिला आहे.