अखेर अकराव्या दिवशी सुटला रेमंड कंपनीतील संपाचा तिढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:26 IST2025-08-01T15:22:06+5:302025-08-01T15:26:12+5:30
रात्री उशिरापर्यंत चालल्या बैठक : चार दिवसांचे वेतन देण्यावर कंपनी झाली राजी

The strike at Raymond Company finally ended on the eleventh day.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील रेमंड कंपनीतील कर्मचाऱ्यांनी नव्या अॅग्रिमेंटच्या मागणीसाठी संप पुकारला होता. मागील दहा दिवसांपासून यामुळे कंपनीतील कामकाज ठप्प झाले होते. हा संप मिटविण्यासाठी विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींशी गत दहा दिवसांपासून चर्चाही सुरू होती. अखेर गुरुवारी या चर्चा आणि वाटाघाटीला यश आले आहे. दिवसभर चाललेल्या चर्चेनंतर रात्री उशिरा कामगारांनी कामावर जाण्याचा निर्णय घेतला. कंपनीही संपकाळातील चार दिवसांचे वेतन कामगारांना देणार आहे.
गुरुवारी रेमंड कंपनीतील प्रशासकीय कार्यालयात दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. या बैठकांमध्ये प्रमुख तीन मागण्यांवर प्रदीर्घ चर्चा झाली. सायंकाळी लोहारा स्थित गंगाकाशी लॉनमध्ये सर्व कामगार संघटना आणि कामगारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी मान्यताप्राप्त ५२-५२ संघटना, प्रहार संघटना, विश्वकर्मा संघटना आणि जनआक्रोश संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये जनआक्रोश संघटनेचे अक्षय यादव, प्रहार संघटनेचे सचिन देशमुख, विश्वकर्मा संघटनेचे अंबादास मोहुर्ले, मान्यताप्राप्त संघटनेचे कैलास इंगळे, जयदेव लकडे, यासोबतच अनिल यादव, प्रवीण प्रजापती, भास्कर केळापुरे, संतोष डोईजड, कामगार विभागाच्या श्रद्धा वाघमारे, तर रेमंड व्यवस्थापनाचे नितीन श्रीवास्तव उपस्थित होते. दरम्यान, रात्री संप मिटल्यानंतर दुसऱ्या पाळीचे कर्मचारी उशिरा कामावर रुजू होत असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.
निलंबनप्रकरणी चौकशी समिती
- कामगारांकडून अॅग्रिमेंटची प्रमुख मागणी होती. यावर प्रथम कामगारांनी कामावर रुजू व्हायचे.
- यानंतर मान्यताप्राप्त संघटनेसोबत अॅग्रिमेंटच्या विषयावर रीतसर बोलणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- त्याचप्रमाणे गत दहा दिवसांच्या कामगारांच्या संपकाळातील वेतनापैकी चार दिवसांच्या संपकाळाचे वेतन कंपनी देणार आहे, तर चार दिवसांच्या संप काळातील सीएल पकडल्या जाण्यावर कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये एकमत झाले.
- संपकाळात मारहाण प्रकरणात सहा कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
- या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता समिती स्थापन करण्यात आली आहे. एक महिन्यात चौकशी करून निलंबित कामगारांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.