लोकमत न्यूज नेटवर्कवणी : रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहे. रस्त्यावरून देशाच्या विकासाची व्याख्या ठरवली जाते. मात्र, ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, वणी विधानसभा क्षेत्रात काही भागांत अजूनही दळणवळणाची व्यवस्था सुरळीत झाली नाही. तालुक्यातील शिरपूरमार्गे शिंदोला व कोरपना या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने, नागरिकांना जिवाची कसरत करीत जीवघेण्या खड्ड्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
वणी तालुक्यातील शिरपूर ते आबई फाटा हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून दिवस-रात्र नागरिकांचे आवागमन सुरू असते. मात्र, पाऊस पडला, तर या मार्गावरील खड्डे पाण्याने भरलेले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता आहे. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावर कोळसा, सिंमेट व दगड वाहतुकीची जड वाहने रात्रंदिवस सुरू असतात. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात मागील दोन वर्षांत बरेच अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला, तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. बऱ्याचदा खड्यांमुळे वाहने फसतात व त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होत असते.
दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर ५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, नवीन काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आता मलमपट्टी लावण्याचे काम सुरू आहे. मार्गाची दुरुस्ती करून डांबरीकरण करावे, या मागणीसाठी उद्धव सेनाच्या वतीने आबई फाटा येथे रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. आंदोलनानंतर तीन दिवस वाहतूक बंद ठेवून दोन ते तीन किलोमीटर रोडवर गिट्टीने खड्डे भरण्यात आले, परंतु गिट्टी आजूबाजूला पसरल्याने पूर्वी पेक्षा परिस्थिती वाईट झाली आहे.
विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो खासगी वाहनांचा आधार
- या मार्गाची अवस्था एवढी वाईट आहे की, या मार्गावरून एसटी बस चालविणे शक्य नाही. त्यामुळे नाईलाजाने महामंडळाने आपले नुकसान टाळण्यासाठी या मार्गावरील बस दोन आठवड्यांपूर्वी बंद केल्या.
- बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे वास्तव या भागात आहे.
ग्रामीण रस्त्याचे भाग्य उजळणार कधी ?
- वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
- शहरी रस्ते स्मार्ट होत असताना 3 ग्रामीण भागातील रस्त्यावर पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यात ग्रामीण भागातील रस्त्याचे भाग्य उजळणार कथी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.