पांढरकवडा (यवतमाळ) : गळ्यात ताराचा फास अडकलेल्या अवस्थेतील पीसी वाघिणीला तब्बल २४ दिवसांनंतर ट्रॅन्क्युलाइज करण्यात यश आले असून, तिच्या गळ्यातील फास काढण्यात आला आहे. सध्या ही वाघीण वन विभागाच्या ताब्यात असून, पुढील दोन दिवस तिच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. अमरावती येथील रेस्क्यू टीमचे अमोल गावनेर व त्यांच्या चमूने ही मोहीम यशस्वी केली.
१ फेब्रुवारी रोजी गळ्यात फास अडकून वाघीण जखमी झाली. जखमी वाघिणीवर वन विभाग लक्ष ठेवून होता. त्यासाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. सोबतच रेस्क्यू टीमच्या माध्यमातून नजर ठेवली जात होती. टिपेश्वर अभयारण्यातील पिलखान परिसरात पीसी वाघिणीने शिकार केली होती, ती शिकार खाण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास वाघीण त्या ठिकाणी आली असता, रेस्क्यू टीमने नेम साधत वाघिणीला ट्रॅन्क्युलाइज केले.
पर्यटकाने काढला होता फोटो
टिपेश्वर अभयारण्यात १ फेब्रुवारी रोजी जंगल सफारीदरम्यान एका वाघिणीच्या गळ्यात ताराचा फास असल्याचे छायाचित्र पर्यटकाने कॅमेराबद्ध केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. गळ्यात शिकारीचा फास अडकून जखमी झालेली वाघीण पर्यटकाने दाखवून दिल्यानंतर पांढरकवडा वन्यजीव विभागाचे नियंत्रण आणि संरक्षण खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे, असे म्हणणाऱ्या व्यवस्थेचा बुरखा फाडला गेला.
वाघीण जखमी दिसूनही दिले नाही कार्यवाहीचे आदेश
जखमी वाघिणीला रेस्क्यू करण्यासाठी अमरावती येथील टीमला पाचारण करण्यात आले होते; परंतु १२ दिवसांनंतरही टीमला वाघिणीचा शोध घेता आला नाही.
जखमी वाघिणीचा शोध 3 घेण्याच्या श्रेयवादासाठी वन विभागात शीतयुद्ध सुरू झाले आहे. १५ फेब्रुवारीला जखमी वाघीण दिसून आली. मात्र, कारवाईचे आदेश दिले गेले नाही.
१६ फेब्रुवारी रोजी एका ३ शार्प शूटरने वाघिणीला डॉट केल्याचा दावा केला व सर्व टीमला वाघिणीचा शोध घ्यायला लावले. चार किलोमीटर परिसर पिंजून काढल्यानंतरही वाघीण मात्र सापडली नव्हती.