यवतमाळ शहरात मंगळवारी रंगणार ‘लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्ड’ सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST2022-03-21T05:00:00+5:302022-03-21T05:00:17+5:30
विविध क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील ३४ कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्ड यवतमाळ २०२१’ या काॅफी टेबल बुकचे प्रकाशन आणि ‘वुमन अचिव्हर्स अवॉर्ड’चा वितरण सोहळा मंगळवार, दि. २२ मार्चला दुपारी ३ वाजता येथील दर्डा मातोश्री सभागृहात आयोजित केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा राहणार आहेत.

यवतमाळ शहरात मंगळवारी रंगणार ‘लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्ड’ सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विविध क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील ३४ कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्ड यवतमाळ २०२१’ या काॅफी टेबल बुकचे प्रकाशन आणि ‘वुमन अचिव्हर्स अवॉर्ड’चा वितरण सोहळा मंगळवार, दि. २२ मार्चला दुपारी ३ वाजता येथील दर्डा मातोश्री सभागृहात आयोजित केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा राहणार आहेत.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजात आपले स्थान उंचाविणाऱ्या महिलांच्या स्फूर्तिदायक यशोगाथेला अक्षर सलाम करणाऱ्या या ‘काॅफी टेबल बुक’च्या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, ‘लोकमत’चे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा, यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, लोकमत अमरावती युनिटचे महाव्यवस्थापक सुशांत दांडगे, संपादकीय प्रमुख गजानन चोपडे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
‘लोकमत’ने विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या कर्तबगारीला नेहमीच नवा आयाम दिलेला आहे. याचेच प्रत्यंतर हे काॅफी टेबल बुक वाचताना येईल. पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रांतील कर्तृत्वशालिनी असलेल्या जिल्ह्यातील ३४ कर्तबगार महिलांना ‘लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्ड’ने अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते गाैरविण्यात येणार आहे. यामध्ये अनघा गद्रे, अंजली नालमवार, अपूर्वा सोनार, अरुणा खंडाळकर, अस्मिता वैद्य, भावना शेटे, चारुलता पावशेकर, छाया राठोड, प्रा. डाॅ. आशाताई देशमुख, डाॅ. रश्मी बंग, कालिंदाताई पवार, कांचनताई चाैधरी, कविता भोयर, माधुरी आसेगावकर, मनीषा आकरे, मृणाल डगवार, नयना ठाकूर, प्रीतीताई धामणकर, प्रियंका परळीकर, राखी पुरोहित, रत्नप्रभादेवी सोनी, सदबजहाॅ, संध्याताई पोटे, संध्याताई सव्वालाखे, सरोज भंडारी, सविता रेड्डी, शीतल पोटे, शोभना येरावार (काशेटवार), सुनीता जयस्वाल, प्रा. डाॅ. स्वाती वाठ, वैशाली देशमुख, वंदना चिद्दरवार, वनमालाताई राठोड आणि वर्षा वैद्य यांचा समावेश आहे. लोकमत वाचक व सखी मंचच्या सर्व सदस्यांना या कार्यक्रमासाठी सादर आमंत्रित करण्यात आले आहे.
ज्योत्स्ना दर्डा यांना बुधवारी संगीतमय श्रद्धांजली
- ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीदिनी २३ मार्चला बुधवारी शक्तिस्थळ, दर्डा उद्यान येथे सकाळी ९ ते ९.४५ या वेळेत श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. याप्रसंगी अमोलकचंद महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख प्रा. डाॅ. राहुल एकबोटे आणि संच भक्तिगीत सादर करणार आहेत.
शक्तिस्थळ येथे मंगळवारी ‘स्वरांजली’चे आयोजन
लोकमत सखी मंचच्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांचा २३ मार्चला स्मृती दिन आहे. याच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. २२ मार्च) सायंकाळी ६.३० वाजता शक्तिस्थळ, दर्डा उद्यान येथे ‘स्वरांजली’चे आयोजन करण्यात आले आहे. सहाव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराची विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर आणि आठव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्काराचे विजेते तसेच सुप्रसिद्ध संगीतकार लिडियन नादस्वरम स्वरांजली सादर करणार आहेत.