इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा होणार ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:53 IST2025-05-08T17:51:18+5:302025-05-08T17:53:58+5:30
सुसूत्रता आणण्यासाठी नियोजन : सर्वसाधारण होणार चार फेऱ्या

The admission process for class 11 will be online this year.
सूरज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महानगरपालिका क्षेत्रातील माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक महाविद्यालयात इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत होते. त्यात आणखी सुसूत्रता आणण्यासाठी शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने व ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. तर एसएसव्हीसी व्यावसायिकाचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयांना उपलब्ध करून देणे, विहित मुदतीत माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे, शाळा स्तरावरील कामकाज पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी खासगी व्यवस्थापनाची राहणार आहे. प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे व गुणवत्ता आधारे करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. खासगी व्यवस्थापनाने माहिती देण्यास विलंब करणे, टाळाटाळ करणे, खोटी व दिशाभूल करणारी माहिती सादर करणे, खासगी व्यवस्थापनास दंड आकारणे, २०२५-२६ वर्षात प्रवेशास मनाई करणे, आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यासाठी शिक्षण उपसंचालकांना प्राधिकृत केले आहे. विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान पैकी प्रत्येक फेरीत एका शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदलण्याची मुभा राहणार आहे. बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
दहा पसंतीक्रम भरता येणार
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशासाठी प्राधान्यक्रम भरताना किमान एक प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असून, कमाल दहा पसंतीक्रम भरता येणार आहे. गुणवत्तेनुसारच प्रवेश देण्यात येणार आहे. प्रथम प्राधान्य क्रमांच्या प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचा प्रवेश रद्द करता येईल. तसेच पुन्हा 'सर्वांसाठी खुला' विशेष फेरीत सहभागी होता येईल.
चार फेऱ्यांमधून गुणवत्तेनुसार प्रवेश
- इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- सर्वसाधारण चार फेऱ्यांचे गुणवत्तेनुसार आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक, समांतर आरक्षण लागू राहणार आहे. त्यानंतर 'सर्वांसाठी खुली' या विशेष फेरीचे आयोजन करण्यात येईल.
अर्ज मागे घेण्याचा पर्याय उपलब्ध
आयटीआय व पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेणारे बरेचसे विद्यार्थी अकरावीसाठी अर्ज भरतात. काही अकरावीत घेतलेला प्रवेश रद्द करून आयटीआय व पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. मात्र, ज्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेत अर्ज केला. तसेच पॉलिटेक्निकला ही अर्ज केला, असे विद्यार्थी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत येत राहतात. अशा विद्यार्थ्यांना अर्ज मागे घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
२८ मे पर्यंत ऑनलाइन प्रोफाईल तयार करता येईल
दहावीच्या निकालानंतर ११ प्रवेश प्रक्रिया गुंतागुंतीची होते. यात सुसूत्रता आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून आताच नियोजन केले जात आहे.
असे आहे वेळापत्रक
शाळा, महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावर भरणे व अद्ययावत करण्याचा कालावधी ८ ते १५ मे आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी उच्च माध्यमिकच्या शाखांची माहिती प्रमाणितचा कालावधी ८ ते १६ मे आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रोफाईल तयार करणे व विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरण्याचा कालावधी १९ ते २८ मे आहे. त्यानंतर प्रवेश प्रकियेसाठी फेरी सुरू होणार असून, ११ ऑगस्ट किंवा शासन निर्धारित करेल, त्या तारखेपासून इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे.