भयंकर! पाच दिवसांच्या चिमुकलीला दिले बिब्याचे चटके, प्रकृती गंभीर

By सुरेंद्र राऊत | Updated: June 17, 2023 14:40 IST2023-06-17T14:39:38+5:302023-06-17T14:40:00+5:30

श्वसनाचा त्रास असल्याने केला अघोरी उपाय

Terrible! A five-day-old baby was given a whiplash, her condition is critical | भयंकर! पाच दिवसांच्या चिमुकलीला दिले बिब्याचे चटके, प्रकृती गंभीर

भयंकर! पाच दिवसांच्या चिमुकलीला दिले बिब्याचे चटके, प्रकृती गंभीर

यवतमाळ : ग्रामीण भागात अजूनही आराेग्य सुविधा पाेहाेचलेल्या नाही. त्यामुळे अजूनही उपचाराच्या अघाेरी पद्धतीचा वापर केला जाताे. यातून भयंकर असे परिणाम पुढे येत आहेत. जिल्ह्यातील आदिवासीबहूल घाटंजी तालुक्यातील दुर्गम गावात असा गंभीर प्रकार घडला. पाच दिवसांच्या चिमुकलीला श्वसनाचा त्रास असल्याने ती सारखी रडत हाेती. ती रात्रभर झाेपत नसल्याने उपाय म्हणून तिला बिब्याचे चटके देण्यात आले. यानंतर तिची प्रकृती आणखी गंभीर झाली आहे. आता तिची यवतमाळ शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.

घाटंजी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेची प्रसूती झाली. मुलगी झाली तरी रोज मजुरी करणाऱ्या कुटुंबाला मोठा आनंद झाला. सर्वत्र नव्या बाळाचे कौतुक होऊ लागले. प्रसूती मुलीच्या आईला टाके पडल्याने तीन दिवस आरोग्य केंद्रातच ठेवले हेाते. नंतर तेथून सुटी करण्यात आली. तोपर्यंत बाळ हसत खेळत होते. घरी आल्यानंतर दोन दिवस बाळाची प्रकृती चांगली होती. पाचव्या दिवशी मात्र बाळ काही केल्या झोपत नव्हते. सारखे धापत होते. काळजी पोटी घरात कुणालाच झोप नव्हती. कुणीतरी उपाय सांगितला, सर्दी, कफ याचा त्रास असल्याने हे होत आहे. त्याला बिबा लावला तर लवकर आराम पडले. म्हणून हा अघोरी उपाय करून बघितला.

कोवळ्या मुलीला गरम बिब्याचे चटके देण्यात आले. सलग तीन दिवस उपाय करूनही आराम पडत नसल्याने अखेर चिमुकलीच्या आई-वडिलांनी थेट यवतमाळ गाठले. येथील काही खासगी रुग्णालयात बाळाला दाखविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने एकाही खासगी डॉक्टरांनी उपचार करण्याची हिम्मत दाखवली नाही. थेट नागपूरला जाण्याचा सल्ला देण्यात आला. आर्थिक स्थिती नसल्याने आठ दिवसांच्या मुलीला गंभीर अवस्थेत घेऊन आई-वडील शासकीय रुग्णालयात पोहोचले. तेथे डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. तिची प्रकृती अजूनही गंभीर आहे. न्युमोनिया झाल्याने तिच्या अवयवांवर परिणाम झाला आहे. बिब्याचे चटके दिल्याने शरीरावर जखमा आहेत. आता या चिमुकलीचा जीवन मरणाचा संघर्ष सुरू आहे.

Web Title: Terrible! A five-day-old baby was given a whiplash, her condition is critical