चौथीच्या शाळेने दिली सातव्या वर्गाची टीसी
By Admin | Updated: December 24, 2014 23:07 IST2014-12-24T23:07:45+5:302014-12-24T23:07:45+5:30
तालुक्यातील पांढुर्णा खु. येथील सामकी माता अपंग निवासी विद्यालयाला इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शासन मान्यता असताना येथील माजी प्रभारी मुख्याध्यापिकेने शाळेच्या चपराशासोबत

चौथीच्या शाळेने दिली सातव्या वर्गाची टीसी
गुन्हा दाखल : पांढुर्णा येथील निवासी विद्यालयातील प्रकार
पुसद : तालुक्यातील पांढुर्णा खु. येथील सामकी माता अपंग निवासी विद्यालयाला इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शासन मान्यता असताना येथील माजी प्रभारी मुख्याध्यापिकेने शाळेच्या चपराशासोबत संगनमत करून एका विद्यार्थ्याला चक्क इयत्ता सातवी उत्तीर्णतेची टीसी दिल्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी खोटे दस्तावेज तयार करून संस्थेची फसवणूक व दिशाभूल केल्याबद्दल सदर मुख्याध्यापिकेसह शिपायावर पुसद ग्रामीण पोलिसांवर गुन्हे दाखल केले आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शोभा रमेश पिलाजी (४७) रा.हटकेश्वर वॉर्ड पुसद व उल्हास सुका पवार (४५) रा.पारवा ही गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. या प्रकरणी सदर संस्थेचे विद्यमान प्रभारी मुख्याध्यापक तथा अधीक्षक अनिल लखू चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. सामकी माता अपंग निवासी विद्यालयाला इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शासन मान्यता आहे. १९९६ पासून पांढुर्णा येथे शाळा सुरू असून २६ जून २००७ पर्यंत शोभा रमेश पिलाजी या सदर शाळेत विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. दरम्यान या कालावधीत त्यांनी मुंगशी येथील एका विद्यार्थ्याला खोटे दस्तावेज तयार करून इयत्ता सातवी उत्तीर्णतेची टीसी दिली. त्यामुळे त्यांनी शाळेची फसवणूक व बदनामी केल्याचा आरोप पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे. करण्यात आला असून या कामात त्यांना शाळेचा शिपाई उल्हास सुका पवार याने मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याच कालावधीत सदर शिक्षिकेने बीड जिल्ह्यातील एका अनुदानित शाळेत सेवा दिली. त्यामुळे एकाच शिक्षिकेने दोन ठिकाणी शासन मान्य संस्थांमध्ये नोकरी करून वेतन घेऊन शासनाची फसवणूक केली आहे, अशा प्रकारची तक्रार अनिल चव्हाण यांनी पुसद ग्रामीण पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी शोभा पिलाजी व उल्हास पवार या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
या बनावट दस्तावेज प्रकरणामागे पुसद शहरातील बसस्थानक परिसरातील एक नामांकित डॉक्टर असल्याचीही चर्चा आहे. या प्रकरणी पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)