दुकान गाळ्यांवर भाडेकरू मालामाल
By Admin | Updated: October 13, 2014 23:27 IST2014-10-13T23:27:25+5:302014-10-13T23:27:25+5:30
गेल्या १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने बेरोजगारांसाठी शहरात बांधलेले दुकान गाळे अल्प दराने भाड्याने घेऊन तेच गाळे आता जादा दराने इतरांना भाड्याने देऊन घरबसल्या पैसे कमाविण्याचा

दुकान गाळ्यांवर भाडेकरू मालामाल
मारेगाव : गेल्या १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने बेरोजगारांसाठी शहरात बांधलेले दुकान गाळे अल्प दराने भाड्याने घेऊन तेच गाळे आता जादा दराने इतरांना भाड्याने देऊन घरबसल्या पैसे कमाविण्याचा उद्योग काहींनी सुरू केला आहे़
तालुक्यातील बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने शहरात आंबेडकर चौकालगत दुकान गाळे काढले़ त्यावेळी अत्यल्प आणि नाममात्र ५०० रूपये दरमहा भाड्याने ही दुकान गाळे बेरोजगार तरूणांना भाड्याने देण्यात आली़ तेथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू करून ते आत्मनिर्भर व्हावे, असा हेतू यामागे होता. युवकांना त्यामुळे रोजगार मिळून ते बेरोजगार राहू नये, अशी भावना होती. या खाळ्यांमुळे त्यांच्या कुटुंबाला उदरनिवार्हाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले होते.
त्यावेळी बहुतांश बेरोजगार तरूणांनी या गाळ्यात दुकाने थाटून रोजगार मिळविण्याचा प्रयत्नही केला़ परंतु अनेकांना आपल्या व्यवसायात अपयश आल्याने त्यांनी आपले व्यवसाय बंद केले़ मात्र त्यांनी ग्रामपंचायतीच्या या गाळ्यांवरील ताबा अद्याप सोडला नाही़ ज्या बेरोजगार तरूणांना व्यवसायात अपयश आले, त्यांनी आता नवीन फंडा शोधून काढला़ ग्रामपंचायत प्रशासनाकडून केवळ ५०० रूपये दरमहा भाड्याने घेतलेले हे दुकान गाळे, आता या बेरोजगारांनी दुसऱ्यांना परस्पर चढ्या भावाने भाड्याने दिले अहेत.
ग्रामपंचायत भाड्यापोटी दरमहा केवळ ५०० रूपये जमा करून वरील पाच हजारांच्यावर रूपये या तरूणांना काहीही न करता मिळत आहेत. त्यामुळे दुकान टाकण्यापेक्षा हा धंदा बरा, अशी प्रवृत्ती यांच्यात वाढली आहे़ या गाळेधारकांपैकी काहींनी रोजगाराचा हा दुसरा मार्ग स्वीकारला आहे़ तरीही अद्याप ग्रामपंचायतीने या गाळेधारकांकडील दुकान गाळे परत घेतले नाहीत़ मारेगाव शहरात दुकान गाळ्याची कमतरता आहे़ अनेक बेरोजगार तरूण दुकान गाळे शोधत आहे़ एखादे दुकान गाळे भाड्याने घ्यायचे म्हटले, तर पगडी म्हणून लाखो रूपये जमा ठेवावे लागतात़ दरमहा भाडेही भरपूर असते़
त्यामुळे या बेरोजगार तरूणांची कुचंबना होत आहे़ दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणाने काही बेरोजगार काहीही न करता घरबसल्या हजारो रूपये दर महिन्याला कमावत आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाने भाड्याने दिलेले सर्व गाळे ताब्यात घेऊन नव्याने या गाळ्यांचा लिलाव करावा, अशी मागणी बेरोजगार तरूणांकडून होत आहे़ (शहर प्रतिनिधी)