वणी येथील शिक्षकाला १४ लाखांनी गंडा; ऑनलाइन केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:39 IST2025-03-10T12:38:27+5:302025-03-10T12:39:17+5:30
Yavatmal : शेअर मार्केटमधून काळ्या यादीत टाकण्याची धमकी

Teacher in Wani duped of Rs 14 lakh; online fraud
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी (यवतमाळ) : येथील एका शिक्षकाला कमी किमतीत शेअर मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्याने १३ लाख ६७ हजारांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. किशोर ओंकार चौधरी, असे फसगत झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचे नाव असून, ते वणीतील गुलमोहर पार्कमधील रहिवासी आहेत. त्यांनी वणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बारकलेस सिक्युरिटी कंपनीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी महिलेने किशोर चौधरी यांच्याशी व्हॉटस्अॅपवरून चॅटिंग करून ५० टक्के डिस्काउंट रेटवर आयपीओ सबस्क्राइब करून देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी प्रायमरी ट्रेडिंग अकाऊंट काढण्यासाठी एका कंपनीचे मोबाइल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावरून चौधरी यांनी संबंधित अॅपद्वारे टप्प्या-टप्प्याने १३ लाख ६७हजार रुपये जमा केले. यानंतर या अॅपमध्ये वेळोवेळी चौधरी यांनी जमा केलेली रक्कम दर्शविल्यात जात होती.
तसेच या रकमेचा वापर करून त्यांनी करावयास सांगितलेल्या ट्रेडद्वारे चौधरी यांच्या प्रायमरी शेअर मार्केट अकाउंटमध्ये ४४ लाख ६५ हजार ५७४ रुपयांची रक्कम जमा असल्याचे दिसत होते. त्यानंतर संबंधित ग्रुपच्या महिला अॅडमिनने चौधरी यांना पुन्हा नवीन येऊ घातलेल्या एका कंपनीच्या आयपीओला सब्स्क्राइब करण्यास सांगितले. मात्र, चौधरी यांनी आता आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. जर आयपीओचे पैसे न भरल्यास काय होऊ शकते, याविषयी विचारणासुद्धा केली. तेव्हा आरोपींनी फिर्यादीस काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये जेवढे पैसे आहेत, तेवढ्याच पैशाचे शेअर मिळत असल्याचे सांगितले; परंतु ५ मार्च रोजी चौधरी यांच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये एकूण ५९ लाख ६५ हजार रुपयांचे आयपीओ अलॉट झाल्याचा मेसेज आला. तेव्हा चौधरी यांनी आरोपी महिलेला याबाबत सांगितले.
शेअर मार्केटमधून काळ्या यादीत टाकण्याची धमकी
आरोपी महिलेने काही तरी करू, असे सांगितले आणि नंतर ६ मार्च रोजी चौधरी यांना उर्वरित १५ लाख रुपये भरणा करण्यास सांगितले. पैसे न भरल्यास आतापर्यंतची पूर्ण रक्कम म्हणजेच ४४ लाख ६५ हजार ५७४ रुपये कंपनी ब्लॉक करील आणि चौधरी यांना प्रायमरी शेअर मार्केटमधून काळ्या यादीत टाकले जाईल, असे सांगितले. त्यामुळे चौधरी यांना हा प्रकार संशयास्पद आला.
आरोपींनी १८ फेब्रुवारीपासून ६ मार्चपर्यंत चौधरी यांची १३ लाख ६७हजार ५७४ रुपयांनी ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केल्याची बाब लक्षात आली. त्यामुळे चौधरी यांनी या संदर्भात वणी पोलिस ठाण्यात तक्रार केली. फिर्यादी यांच्या लेखी तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले करीत आहेत.