उद्दिष्ट तीन हजाराचे; होतात केवळ पाचशे चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST2021-08-04T05:00:00+5:302021-08-04T05:00:27+5:30
संभाव्य धोका कायम आहे. हा बदल लवकर लक्षात यावा, यासाठी जिल्ह्यात दिवसाला तीन हजार कोरोना तपासण्या करण्याचे टार्गेट दिले आहे. प्रत्यक्षात मात्र ५०० ते १००० पर्यंतच नमुने संकलित होतात. कधी कधी तर २५० ते ३०० नमुने तपासले जातात. त्यामुळे कोरोनाची कमी झालेली रुग्णसंख्या कमी तपासणीचा परिणाम तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. तपासण्या थांबल्यामुळे डेल्टा प्लस संसर्गाचा अंदाज चुकू शकतो.

उद्दिष्ट तीन हजाराचे; होतात केवळ पाचशे चाचण्या
सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात आतापर्यंत डेल्टा प्लसच्या संसर्गाचे १५ च्यावर रुग्ण आढळले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली. मात्र, संभाव्य धोका कायम आहे. हा बदल लवकर लक्षात यावा, यासाठी जिल्ह्यात दिवसाला तीन हजार कोरोना तपासण्या करण्याचे टार्गेट दिले आहे. प्रत्यक्षात मात्र ५०० ते १००० पर्यंतच नमुने संकलित होतात. कधी कधी तर २५० ते ३०० नमुने तपासले जातात. त्यामुळे कोरोनाची कमी झालेली रुग्णसंख्या कमी तपासणीचा परिणाम तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. तपासण्या थांबल्यामुळे डेल्टा प्लस संसर्गाचा अंदाज चुकू शकतो. यामुळे अचानक गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्धारित तपासण्यांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे झाले आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
कोरोनाचे रुग्ण दिवसाला २ किंवा ५ इतक्याच संख्येत आढळत आहेत. त्यामुळे काॅन्टॅक्ट ट्रेसिंग अगदी सोपे झाले आहे. त्यातही वर्गवारी करत हायरिस्कमध्ये असलेले आणि कमी रिस्कमध्ये असलेले अशांचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. जेणेकरून फैलाव थांबविता येईल.
ग्रामीण भागावर अधिक लक्ष
ग्रामीण भागातील गर्दीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष दिले जात आहे. आरोग्य केंद्रांमध्ये आलेल्या तापाच्या रुग्णांचे नमुने घेतले जात आहे. यातून कोरोनावर लक्ष आहे.
आठवडी बाजार व इतर परिसरात नमुने तपासणीचा कॅम्प लावण्याच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी होताना कुठेच दिसत नाही.
कोठे, काय घेतली जात आहे दक्षता?
बसस्थानक - यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील सोळाही तालुक्याच्या ठिकाणी कुठेच बसस्थानकावर कोरोना तपासणीची सुविधा नाही. ही मोहीम अनेक दिवसांपासून बंद आहे.
आठवडीबाजार - शहरासह ग्रामीण भागात सर्वाधिक गर्दी आठवडीबाजारांमध्ये होते. येथे पूर्वी तपासणी केली जात होती. आता तेथेसुद्धा नमुने घेतले जात नाही.
पर्यटनस्थळ - सध्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक पर्यटनस्थळ आकर्षणाचे केंद्र बनले आहे. येथे गर्दी होते. मात्र तपासणीसाठी कोणतीच यंत्रणा तेथे नाही.
शहरातील एन्ट्री पॉईंट - शहराच्या एन्ट्री पाॅईंटवर सुरुवातीचे काही दिवस कोरोना तपासणी केली जात होती. आता तेथील ही मोहीम बंद करण्यात आली आहे.
सुपर स्प्रेडरला केले आहे टार्गेट
कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला असून, सध्या आता अनेकांच्या संपर्कात येणाऱ्या सुपर स्प्रेडरवरच लक्ष केंद्रित केले आहे. गर्दीच्या ठिकाणे, बाजारपेठ, शासकीय कार्यालये येथे तपासणी केली जाते. याशिवाय काॅन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. - डाॅ. प्रल्हाद चव्हाण, डीएचओ