अर्धा प्लॉट घेताय... सावधान!
By Admin | Updated: July 17, 2017 01:50 IST2017-07-17T01:50:50+5:302017-07-17T01:50:50+5:30
दोघांनी मिळून मोठा प्लॉट घ्यायचा आणि दोघांची दोन स्वतंत्र घरे बांधायची, हा मध्यमवर्गीयांचा शिरस्ता आता मोडीत निघणार आहे.

अर्धा प्लॉट घेताय... सावधान!
संगणकीकृत सातबारा : यापुढे अर्ध्या प्लॉटच्या व्यवहारांवर बंदी
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोघांनी मिळून मोठा प्लॉट घ्यायचा आणि दोघांची दोन स्वतंत्र घरे बांधायची, हा मध्यमवर्गीयांचा शिरस्ता आता मोडीत निघणार आहे. कारण अर्ध्या प्लॉटचा कोणताही व्यवहार यापुढे करता येणार नाही. संगणकीकृत सातबारा प्रणाली कार्यक्षमपणे राबविण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
घर खरेदी करताना अनेक जण दोघे मिळून भागीदारीत मोठा प्लॉट खरेदी करतात. नंतर त्यावर हजार-दीड हजार चौरस फुटांचे दोन भाग करून दोन स्वतंत्र घरे बांधतात. यात चांगला शेजारी मिळण्यापासून, चांगल्या परिसरातील प्लॉट मिळण्यापर्यंतचे फायदे गृहित धरले जातात. अशा व्यवहारात दोघांच्याही जागांचे सातबारे ‘कॉमन’ असतात. अर्ध्या प्लॉटची मालकी स्वतंत्र असली तरी दोघांच्याही सातबाऱ्यावर दोन्ही भागीदारांची नावे येतात. मात्र, आता अशी भागीदारीतील जमीन खरेदी अशक्य होणार आहे.
यासंदर्भात यवतमाळ तहसीलकडून सहायक दुय्यम निबंधकांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही अकृषक झालेल्या सर्वे नंबरमधील कोणत्याही प्लॉटचा अर्धा तुकडा पडेल, असे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एखाद्या जागेची खरेदी होत असेल आणि त्यामुळे त्या जागेचा तुकडा पडणार असेल, तर असे व्यवहार न करण्याच्या सूचना तहसील कार्यालयातून सहायक दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या आहेत. सध्या तहसीलमध्ये प्रत्येक सातबारा संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे. या प्रणालीमध्ये अर्ध्या प्लॉटचा सातबारा जनरेट होत नाही. त्यामुळे अर्ध्या प्लॉटचा व्यवहार झाल्यास फेरफार करताना अडचणी जातात. त्यामुळे अशा प्लॉटच्या खरेदीची यापुढे नोंदणीच करण्यात येणार नाही.
दोन हिस्से बंद
आतापर्यंत जागेची खरेदी पूर्ण होण्यासाठी किमान १ हजार चौरस फुट जागेचा निकष होता. हा निकष नगरपालिका, महानगरपालिकांसाठी वेगवेगळा आहे. याचा आधार घेत आतापर्यंत अनेक बांधकाम व्यावसायिकांनी, ले-आउटधारकांनी १५०० चौरस फुटांचे प्लॉट दोन ग्राहकांना एकत्रितपणे विकले आहेत. यात दोघांचाही सातबारा ‘कॉमन’ ठेवण्यात येतो. परंतु, आता अर्ध्या-अर्ध्या प्लॉटची खरेदीच नोंदणीकृत होणार नाही. संबंधित प्लॉट कितीही मोठा असला तरी त्याचा खरेदीदार एकच असणे आवश्यक ठरणार आहे.