रोजगार नसल्याने युवकाची आत्महत्या, लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून हाताला काम नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 15:05 IST2020-04-25T15:04:18+5:302020-04-25T15:05:32+5:30
गणोरीचा शेतमजूर : बाभूळगावातील दुसरी घटना

रोजगार नसल्याने युवकाची आत्महत्या, लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून हाताला काम नाही
बाभूळगाव (यवतमाळ) : रोजगार नसल्याने चिंताग्रस्त युवकाने आत्महत्या केल्याची घटना गणोरी येथे शनिवारी सकाळी घडली. गणेश श्रीराम जांभुरे (३५) असे या युवकाचे नाव आहे. रोजगाराअभावी आत्महत्येची बाभूळगाव तालुक्यातील चार दिवसातील ही दुसरी घटना आहे. शेतातून काहीही उत्पन्न नाही अन् लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून हाताला काम नाही, यामुळे
वडिलांच्या नावावर असलेली अडीच एकर शेती सांभाळून व रोजमजुरीची कामे करून गणेश हा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता. सध्या शेतीतून काहीही उत्पादन नाही, तर जवळपास महिनाभरापासून हाताला काम नाही. घरात पाच जण खाणारे पण पैसा नसल्याने गणेश चिंतेत होता. शनिवारी सकाळी त्याने स्वत:च्या घरातच आड्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. या घटनेची तक्रार माणिक जांभुरे यांनी बाभूळगाव पोलिसात दिली. पुढील तपास जमादार किसन मंदिलकर हे करीत आहे. रोजगार नसल्याने कंटाळून आत्महत्येची बाभूळगाव तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. घारफळ येथील प्रशांत मंगल ठाकरे (२४) याने बुधवारी गळफास लावून आत्महत्या केली. तो पुणे येथील खासगी कंपनीत होता. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने तो गावी परतला होता.